समोसे तळण्याला उशीर झाल्याने सुनेला रॉकेल टाकून पेटविले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :घरातील लोकांसाठी उपवास सोडण्यासाठी समोसे तळीत असताना उशीर झाल्याच्या कारणावरून सुनेला रॉकेल टाकून पेटवून देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून चांदा (ता.नेवासा) येथील ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून पैकी ४ आरोपी अटक करून श्रीरामपूर न्यायालयासमोर हजर केले असता चौघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधिशांनी दिलेले आहेत.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तैसीम अताऊल्ला कुरेशी (वय २५, रा.चांदा) हिने सिटीकेअर हॉस्पिटलमध्ये ॲडमीट असताना तोफखाना पोलीसांकडे जबाब दिला की, १८ मे २०१८ रोजी सायंकाळी ७ वा. घरातील लोकांना उपवास सोडण्यासाठी समोसे तळीत असताना उशीर का झाला या कारणावरून बिलकीस अब्दुल्ला कुरेशी (सासू) हिने वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली.

व आरोपी नवरा आताउल्ला अब्दूल कुरेशी, सासरा अब्दुल इस्माईल कुरेशी, अमन अब्दुल कुरेशी (दीर), असद अब्दुल्ला कुरेशी (दीर) यांनी शिवीगाळ करून केसाला धरून खाली पाडले. तसेच आरोपी नं.२ सासू हिने अंगावर रॉकेल टाकून काडीपेटीतील काडी पेटवून अंगावर टाकली. जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यावरून तोफखाना पोलीस ठाण्याने झिरो नंबरने गुन्हा सोनई पोलीस ठाण्यात वर्ग केल्याने २४ मे २०१८ रोजी दुपारी ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला.

फिर्यादीचा नवरा आताउल्ला कुरेशी, सासू बिलकीस कुरेशी, सासरा अब्दुल्ला कुरेशी, दीर अमन कुरेशी, दीर असद कुरेशी यांच्या विरुध्द भा.दं.वि.कलम ३०७, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. नवरा वगळता सासू,सासरा, दीरांना अटक करून श्रीरामपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.