मागण्या शेतकरी हिताच्या नसल्याने शेतकरी संघटना संपात सहभागी नाही.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- देशातील विविध शेतकरी संघटना व इतर संघटनांनी १ जून ते १० जून या कालावधीत संप करण्याची घोषणा केली आहे. या संपातील मागण्या शेतकरी हिताच्या नसल्यामुळे शेतकरी संघटना या संपात सहभागी होणार नाही, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली. 


देशभरातील अनेक शेतकरी संघटना एकत्र येऊन १ जून ते १० जून संप करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तथापि संपातील मागण्या शेतकरी हिताच्या नसून नुकसान करणाऱ्या व शेतकऱ्याला कायमस्वरूपी सरकारवर अवलंबून ठेवणाऱ्या आहेत.

सध्या राज्य शासन देत असलेल्या आधारभूत किमती, प्रत्यक्ष उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के कमी आहेत, तरी नोंदणी केलेला शेतमाल शासनाला खरेदी करता येत नाही. त्यासाठी आवश्यक संरचना सरकारकडे नाही. गोदामे, काटे, बारदाणा, सुतळी, मनुष्यबळ व पैसेही नाहीत, अशा परिस्थितीत शासनाकडून उत्पादन खर्च अधिक ५० टक्के हमी भावाची अपेक्षा करणे हास्यास्पद आहे, अशी टीकाही घनवट यांनी केली.

स्वामिनाथन् आयोगातील अनेक शिफारशी शेतकरी विरोधी आहेत, तसेच या संपातील अनेक मागण्या अव्यवहार्य आहेत. ‍शेतकऱ्याला स्वावलंबी करण्यापेक्षा शेतकऱ्याला सरकारच्या दारातील याचक बनवणाऱ्या या मागण्या आहेत. ज्या सरकारला आता नोकरांचे पगार करणे सुद्धा मुश्किल झाले आहे.

लाखो कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेले आहे. त्या सरकारकडून संरक्षणाची अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे, त्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या संपात सहभागी होणार नाहीत. या संपामध्ये कोणाला सहभागी होण्यापासून थांबवणारही नाहीत. त्यास शेतकरी संघटना जबाबदार राहणार नाही, असे घनवट यांनी यावेळी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.