संगमनेरमध्ये धोंड्याच्या महिन्यात संधीसाधुंना 'पर्वणी',अपघात झालेल्या गाडीतील आंबे लंपास.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर मधील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या चंदनापुरी घाटात आंब्याची गाडी उलटली आणि लोकांची अक्षरश: चंगळ झाली. धोंड्याचा महिना चालू असल्याने आंब्याचे बाजारभावही कडाडलेले आहेत. 

मात्र पलटी झालेल्या आंब्याच्या गाडीने लोकांमध्ये गोडी आणली. अस्तव्यस्त पडलेल्या रसाळ आंब्याची लोकांकडून अगदी आनंदात 'लूट' चालूच होती. काहींनी जीन्स पॅन्ट व गोण्यांमध्ये हे आंबे भरलेले होते. त्यामुळे लोकांना हुसकावताना पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाली.

ही घटना गुरुवार दि. २४ मे रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. . याबाबत माहिती अशी की, मालवाहू टॅम्पो क्रमांक हिच्यावरील चालक हा आंबे घेऊन आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने येत होता. गुरुवारी पहाटे चंदनापुरी घाटात आला असता त्यावेळी त्याचा टॅम्पोवरील ताबा सुटल्याने हा टॅम्पो पलटी झाला. त्यामुळे टॅम्पो मधील सर्व आंबे महामार्गावर अस्तव्यस्त पडलेले होते. तर काही आंब्यांचा चेंदामेंदाही झाला होता.

आंब्याची गाडी पलटी झाल्याची माहिती कळताच अनेकांनी पहायेच्या वेळीही त्या ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे ज्याला वाटेल त्याने या आंब्यांवर डल्ला मारला. तर काहींनी जीन्स पॅन्ट व गोण्यांमध्ये आंबे भरले. घटनेची माहिती तालुका पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांना पाहून अनेकांनी काढतापाय घेतला. तर काही लोक त्यांच्यासमोर आंबे घेत होते. त्यांना हुसकावताना पोलिसांची चांगलीच दमछाकही झाली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.