नैसर्गिक आपत्ती वेळी हयगय करणाऱ्या यंत्रणा व अधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही करणार - जिल्हाधिकारी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. तसेच पावसाळापूर्व काळात करावयाच्या सर्व उपाययोजना तात्काळ कराव्यात, जेणेकरुन नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. मात्र, आपत्ती व्यवस्थापनात हयगय करणाऱ्या यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. जिल्हास्तरीय आणि प्रत्येक तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.


येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सन 2018 नैसर्गिक आपत्ती, पूर प्रतिबंधात्मक आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, उपमहावनसंरक्षक आदर्श रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडधे आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, प्रत्येक यंत्रणांनी त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडली पाहिजे. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे जनजीवन विस्कळीत होणार नाही, जीवित वा वित्तीय मालमत्तेची हानी होणार नाही, यासाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना संबंधित यंत्रणांनी पावसाळ्यापूर्वीच करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने बहुतांशी विभागांनी काम सुरु केल्याचे दिसून येत आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात कोणत्याही प्रकारे नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात हयगय होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. दिलेल्या जबाबदाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आढळून आल्यास सक्त कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले.

प्रत्येक यंत्रणांनी त्यांचा आपत्कालीन कक्ष 24x7 सुरु ठेवावा. त्याठिकाणी अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहतील, याची दक्षता घ्यावी. वेगवेगळ्या यंत्रणांनी गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर व्यवस्थित समन्वय आणि संपर्क ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिल्या.

पावसाळ्यात जलजन्य आजारांचे प्रमाण लक्षात घेता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, जलसंधारण विभाग, पाटबंधारे विभाग आदींनी आपापल्या क्षेत्रातील जलसाठ्यांची काळजी घ्यावी. तलावांची डागडुजी व्यवस्थित करावी. पशुसंवर्धन विभागाने पावसाळ्यातल पशुंना होणारे आजार लक्षात घेऊन त्याच्या लसीकरणाचे नियोजन करावे. त्यासाठीच्या औषधांचा पुरेसा साठा आताच प्राप्त करुन घ्यावा. विशेषता ज्या भागात पर्जन्याचे प्रमाण अधिक आहे, तेथे ही काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पावसाळ्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या लोकांना योग्य ठिकाणी नेणे, त्यांची व्यवस्था आदींबाबत कार्यवाही करावी. नदी-नाले-ओढे यांचे नैसर्गिक प्रवाह खुले करावेत, त्याअनुषंगाने अतिक्रमणे किंवा इतर अडथळे असतील तर ते दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अति पावसाने नद्यांवरील पूल पाण्याखाली गेले तर वाहतूकीच्या अनुषंगाने नियोजन, त्यासंदर्भातील माहिती फलक लावणे आदींची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी, असे त्यांनी सांगितले.

अकोले व संगमनेर तालुक्यातील काही भागात पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना घडतात. अशावेळी तात्काळ उपचार आणि औषधी साठा नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातक उपलब्ध असेल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वाघ यांनी, जिल्ह्यात एकूण 223 गावे ही पूरप्रवण क्षेत्रात येत असल्याचे सांगितले. जिल्ह्यात अतिवृष्टी, धरणांतून मोठ्या प्रमाणात सोडलेला विसर्ग, धरणांचा फुगवटा, नदीपात्रातील अतिक्रमणे, पूररेषेतील वसलेल्या लोकांचा स्थलांतरास विरोध ही मुख्य कारणे असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील 97 महसूली मंडळांतही पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षात 1077 या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनाआपत्कालिन नैसर्गिक आपत्ती संदर्भातील माहिती देता येईल. याशिवाय, 0241- 2323844 आणि 0241- 2356940 या नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधून माहिती देता येईल, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला सर्व विभागांचे उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, पाटबंधारे, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, महापालिका, नगरपालिका, दूरसंचार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसंधारण, अग्निशामक दल, होमगार्ड, पोलीस आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.