चारित्र्यवान लोकप्रतिनिधी निवडून देण्याची सद्बुध्दी देण्याकरिता घालणार पांडूरंगाला साकडे !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कामे न करता वारंवार निवडून येणारे लोकप्रतिनिधींना खुर्चीवरुन पायउतार करण्यासाठी पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने महाराष्ट्राचा महामंत्र भाकरी फिरवा 2019 ची घोषणा करण्यात आली असून, या घोषणेचे पुजन पंढरपुरला महाराष्ट्राचे कुलदैवत पांडूरंगाच्या चरणी केले जाणार आहे. तर पांडूरंगाला साकडे घालून महाराष्ट्रातील जनतेला कामे करणारे चारित्र्यवान लोकप्रतिनिधी निवडून देण्याची सद्बुध्दी देण्यासाठी प्रार्थना केली जाणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

अनेक लोकसभा व विधानसभा मतदार संघात तेच ते लोकप्रतिनिधी वारंवार निवडून येत आहे. खुर्ची मिळाल्यानंतर यांना अहंम व गर्व निर्माण झाला असून, जनतेचे सेवक असून ते सर्व सामान्य जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेक वर्ष लोकप्रतिनिधी राहून सुध्दा त्यांना मुलभुत सुविधा निर्माण करता आल्या नाहीत. जनेतेशी बांधिलकी सोडून गरिब दुबळ्यांचे शोषण त्यांच्याकडून होत असून, त्यांच्यामुळे सरांजमशाही उदयास आली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

लोकप्रतिनिधींनी निर्माण केलेले साखर कारखाने ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनी सारखे जाचक ठरत आहे. लोकांना आपल्या दावणीला बांधण्याचा हा प्रकार आहे. आपल्यावर स्तुतीसुमने उधळणार्‍या लाभार्थी व कार्यकर्ते बनविण्याचे काम याच्या माध्यमातून केले जात आहे. नागरिकांनी मोठ्या अपेक्षांनी या लोकप्रतिनिंधींना निवडून दिले. त्यांनी मात्र आश्‍वासनांचे राजकारण करुन जनतेचा भ्रमनिराश केला आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप सरकारला अर्धांगवायू झाला आहे. लोककल्याणाची कामे करण्यात ते असमर्थ ठरले असून, एकमेकांच्या आरोप प्रत्यारोपात ते गुंतले आहे. स्वत:चेच भले करण्यात गुंतलेल्या मंत्रींना जनतेच्या प्रश्‍नांशी काहीही देणेघेणे राहिले नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

तव्यावरील भाकरी फिरवली नाहीतर ती करपते व त्याचा उपयोग होत नाही. अशा पध्दतीने नेहमीच निवडून येणारे लोकप्रतिनिधी खुर्चीवरच चिटकून राहिल्याने काम न करता सत्तासुर झाले असल्याची प्रचिती सर्वांना येत आहे. तर मते विकणारे नागरिक स्वत: नरकयातना मागत आहे. भाकरी फिरवा या मंत्राने वारंवार निवडून देवून काम न करणार्‍या लोकप्रतिनिधींना पाय उतार करण्यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून परिवर्तनाची हाक देण्यात आलेली आहे. यासाठी अ‍ॅड.गवळी, कॉ.बाबा आरगडे, श्यामराव साबळे, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, दिगंबर साबळे, ज्ञानदेव काळे, प्रकाश थोरात, यमनाजी म्हस्के प्रयत्नशील आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.