उसाला भाव दिला नाहीतर शेतक‍ऱ्यांचा व ज्ञानेश्वरचा संघर्ष अटळ - शंकारराव गडाख.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  ज्ञानेश्वर साखर कारखाना गळीत हंगामात खरच जर राज्यातील पहिल्या पाच कारखान्यात आहे, तर मग उसाला २५०० रुपये भाव जाहीर करून शेतक‍ऱ्यांना २१०० रुपयेच भाव कसा दिला. ज्ञानेश्वरने जाहीर केल्याप्रमाणे शेतक‍ऱ्यांच्या उसाला भाव दिला नाहीतर शेतक‍ऱ्यांचा व ज्ञानेश्वरचा संघर्ष अटळ आहे. त्या संघर्षात सर्वात पुढे मी राहील, असा इशारा माजी आमदार शंकारराव गडाख यांनी घुले बधूंना दिला. 


नरेंद्र घुले यांनी काल गडाख यांचे नाव न घेता जोरदार टीका केली होती त्या पार्श्वभूमीवर गडाख यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादी सोडताना माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यावर घणाघाती टीका केली होती. विधानसभा निवडणुका जशा जवळ येतील तसे घुले व गडाख यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक होणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आमदारकीला गडाख, घुले यांच्यात सामना रंगून ही लढत राज्यातील लक्षवेधी असणार आहे.

शंकरराव गडाख म्हणाले, 'मुळा कारखान्या इतकीच ज्ञानेश्वरची रिकव्हरी आहे. वाहतूक खर्च सारखाच आहे. साखरेच्या विक्रीचा भावही सारखाच आहे. तर मग दोनही कारखान्यांच्या भावात २०० रूपयांचा फरक कसा? कोणता कारखाना किती नंबरला आहे याच्याशी शेतक‍ऱ्यांना घेणे-देणे नाही त्यांना त्यांच्या उसाचा योग्य भाव मिळाला पाहिजे. आता ज्ञानेश्वर साखर कारखाना राज्यात व जिल्ह्यात पहिला आल्याने त्यांनी ७५ कोटी रुपयांचे शेतक‍ऱ्यांना वाटप करायला काय अडचण आहे. ते त्यांनी शेतक‍ऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. अन्यथा शेतक‍ऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी मलाच संघर्ष उभा करावा लागणार आहे, असा इशाराही गडाख यांनी दिला.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.