प्रवरानगर येथील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मागील वादाच्या कारणावरून राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे एकास चाकूने भोकसण्यात आले होते. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले होते. यातील नरेंद्र राजेंद्र भोसले (वय २७ , रा. प्रवरानगर) या युवकाचा सहा दिवसानंतर उपचारादरम्यान काल मृत्यू झाला. लोणी पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी लाला रंजन भोसले सध्या पसार झाला आहे. 

याबाबत फिर्यादी कुणाल किशोर भोसले (वय २३ रा. हसनापूर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी लाला भोसले व मयत राजेंद्र भोसले यांच्यात सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वी वाद झाले होते. तेव्हा पासून लाला त्यास जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. त्या भितीने मयत नरेंद्र हा काही दिवस बाहेरगावी निघून गेला होता.

मात्र, १७ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास आरोपी लाला याच्या घरासमोरून मयत नरेंद्र जात असताना आरोपीने मयतास शिवीगाळ करून दमदाटी केली. आरोपी लाला याने यावेळी 'आज तुझा शेवटच करून टाकतो' असे म्हणत नरेंद्र याच्या पोटात चाकू मारला. त्यावेळी त्याच्या पोटात जखम होऊन तो जबर जखमी झाला होता. त्या अवस्थेत त्यास लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सहा दिवसांच्या उपचारानंतर काल सकाळी साडेसहाच्या दरम्यान मृत्यू झाला. यावेळी स्नेहा उर्फ भोरी विलास चव्हाण हिच्यावरही हल्ला झाल्याने तिची हाताची नस तुटली. जबर जखमी झालेल्या स्नेहास प्रथम प्रवरा रुग्णालयात व नंतर पुणे येथील ससून रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला होता. 

७ मे रोजी हल्ल्यानंतर लोणी पोलिसात लाला रंजन भोसले विरोधात ३०७ अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र काल यातील नरेंद्र याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने लोणी पोलिसांनी ३०२ अन्वये वाढीव कलम लावून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मयत व आरोपी हे दोघे सख्खे चुलत भाऊ असल्याचे समजते. आरोपी लाला भोसले हा घटनेनंतर पसार झाला होता. त्याचा लोणी पोलिस शोध घेत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.