नगराध्यक्ष निवडीचे राजकारण तापले, आमदार विजय औटीना धक्का.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगराध्यक्ष निवडीचे राजकारण तापले असून दोन बलाढ्य नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेनेचे बारा नगरसेवक सहलीला पाठवून खळबळ उडवून दिली. आमदार विजय औटी यांना हा धक्का समजला जात आहे. खुद्द पारनेरमध्येच शिवसेनेला सत्ता गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

२३ मे रोजी नगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा आहे. बहुमतात असलेल्या शिवसेनेच्या वतीने वैशाली आनंदा औटी यांचा अर्ज सादर करण्यात आला. चंद्रकांत चेडे सूचक, तर अनिकेत औटी अनुमोदक आहेत. विरोधकांच्या वतीने अपक्ष नगरसेविका वर्षा शंकर नगरे यांनी अर्ज सादर केला आहे. शशिकला शेरकर अनुमोदक, तर विजेता सोबले सूचक आहेत.

विरोधकांनी कंबर कसल्याने व एका भाजप नेत्याने सूत्र हातात घेतल्याने १२ मासे गळाला लागले आहे. या उलाढालीत अपक्ष नगरेंची नगराध्यक्ष पदाची लॉटरी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक आमदार औटी यांच्या संपर्क कार्यालयात बोलवण्यात आली होती. 

नगराध्यक्षपद खुल्या महिला वर्गासाठी असल्याने वैशाली आनंदा औटी, नंदा साहेबराव देशमाने व सुरेखा अर्जुन भालेकर यांची नावे पुढे आली. आमदार औटी यांनी भालेकर व देशमाने यांना अगोदरच राजकीय चातुर्याने सभापतिपदी विराजमान केले असल्याने वैशाली आनंदा औटी याच नावावर शिक्कामोर्तब झाले. 

पण भालेकरही इच्छुक असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. थोडावेळ पेच निर्माण झाला. पण राजकीय हुशारी दाखवत दोनही उमेदवारांना सव्वा-सव्वा वर्षाचा फॉर्म्युला करण्यात आला. भाजपचे नेते वसंत चेडे यांच्या मदतीने १२ नगरसेवकांना शनिवारी पहाटे सहलीला रवाना करण्यात आले. भाजप सक्रिय झाल्याने येत्या २३ तारखेला नाट्यमयरित्या काय चमत्कार घडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे दिसते. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.