पुणे, कल्याण, मनमाड व औरंगाबाद महामार्गावर वेगवेगळ्या अपघातात चौघे ठार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पुणे, कल्याण, मनमाड व औरंगाबाद महामार्गावर विविध ठिकाणी अपघात होवून यामध्ये चार जण ठार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर-पुणे महामार्गावरील सोनेवाडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत १७ एप्रिल रोजी एका अज्ञात इसमाचा मृत्यू झाला असून, याबाबत पोकॉ. जब्बार पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 


नगर-कल्याण महामार्गावर भरधाव वेगात नगरकडे येणाऱ्या मारुती सुझुकी कारने पुढे चालणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील चंद्रकांत अंतोन शिंदे (रा.चोभे कॉलनी, बोल्हेगाव) यांचा मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी उज्ज्वला शिंदे या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी उज्ज्वला शिंदे यांच्या फिर्यादीवरुन अल्टो मारुती कार (एमएच २०, बीसी ३२७४) चालकाविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नगर-मनमाड महामार्गावरील नागापूर शिवारात भरधाव वेगात मनमाडकडून नगरकडे येणाऱ्या ट्रेलरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील अक्षय सुरेश ठाकूर (रा.वय २७, रा.भिंगार) हा युवक ठार झाला असून, ही घटना बुधवारी (दि.१६) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ट्रेलरच्या (आरजे १९, जीसी ३२२४) चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात आसिफ मुक्तार शेख (रा.मुकुंदनगर) यांच्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

नगर-औरंगाबाद महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने वृद्धास धडक दिली असून, यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि.१९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. प्रभाकर सोन्याबापू आंधळे (वय ६३, रा.मेहेकरी) हे त्यांच्या दुचाकीवरुन (एमएच १६, सी ४४५७) नगर-औरंगाबाद महामार्गाने जात असताना भरधाव वेगात आलेल्या कारने (एमएच १८, व्ही ४५९९) धडक दिली. या धडकेत प्रभाकर आंधळे यांचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोकॉ. जब्बार पठाण हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.