शिर्डीत धावपट्टीवरुन विमान घसरले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : शिर्डीच्या साईबाबा अांतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा विमान अपघात थोडक्यात टळला. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर अलायन्सचे मुंबईहून आलेले विमान सोमवारी सायंकाळी ४.५० वाजता लँडिंग करताना मूळ धावपट्टीच्याही १०० मीटर पुढे राखीव भागापर्यंत गेले. तेथे ते मुरूम आणि मातीत जाऊन थांबले. सुदैवाने या थरारक घटनेत एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. 

चार केबिन क्रू कर्मचाऱ्यांसह सर्व ४२ प्रवासी सुखरूप आहेत. प्रथमदर्शनी विमानाचेही काही नुकसान झालेले नसल्याचे दिसत होते. विमान वाहतूक नियामक डीजीसीए आणि एअर इंडियानेही या घटनेच्या चौकशीचे आदेश
दिले आहेत.मंगळवारी डीजीसीएची टीम येऊन विमान आणि घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. या प्रकारामुळे विमानतळ कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रचंड पळापळ झाली. नेमके काय झाले हे कुणालाच कळेना. त्यामुळे प्रवाशांमध्येही घबराट पसरली. 

विमानतळ व्यवस्थापक धीरेन भोसले, एअर अलायन्स कंपनीचे अधिकारी फलटणकर, प्रमुख सुरक्षा अधिकारी देविदास पवार यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. विमानाचा दरवाजा उघडला. सर्व प्रवाशांना खाली उतरवत धीर दिला. यानंतर शिर्डीहून सायंकाळची हैदराबाद व मुंबई ही दोन्हीही विमाने रद्द करण्यात आली.

साईबाबांमुळे वाचलो
घटनेनंतर विमानातील प्रवाशांनी साईबाबांचा नामाचा गजर केला. एक प्रवासी म्हणाला, साईबाबांमुळेच आम्ही बचावलो.आज आमचं काही खरं नव्हतं. आधी याबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हते. परंतू, विमानाचा अपघात थोडक्यात टळल्याचे कळाल्यानंतर सर्वच प्रवाशांनी साईनामाचा गजर केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.