मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाला नगर शहरातून ६००० सह्यांचे निवेदन


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात यावे यासाठी नगर शहरातून सुमारे ६००० सह्यांचे लेखी निवेदन मागासवर्गीय आयोगाला देण्यात आल्याची माहिती, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत जनसुनावणीसाठी काल (दि.२ मे) शासकीय विश्राम गृह येथे राज्य मागासवर्गीय आयोगाचे पॅनेल नगरमध्ये आले होते. आयोगाचे सदस्य माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, मा. बाळसराफ आदींसह आयोगाच्या प्रतिनिधींनी नगर शहर व जिल्ह्यातून आलेल्या विविध शिष्टमंडळांची यावेळी निवेदने स्वीकारत त्यांची मनोगते जाणून घेतली. यावेळी मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

याबाबत अधिक माहिती देताना काळे म्हणाले की, मराठा समाजाची राज्यातील लोकसंख्या सुमारे ३२ ते ३४ टक्के आहे. मात्र समाजाला त्या प्रमाणात आरक्षण नाही. मराठा समाजातील बहुतांशी लोक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत. विभक्त कुटुंब पध्दतीमुळे मराठा समाजातील दरडोई शेती धारणा क्षेत्र कमी झाले असून यातून शिक्षण घेणे तर दूरच पण उदरनिर्वाह करणे देखील कठीण झाले आहे. यामुळे मराठा समाजातील तरुण उच्च शिक्षणाच्या आणि शासकीय नोकरीतील संधी पासून वंचित आहेत.

नगर जिल्ह्यातून मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी पडली होती. राज्यभरात मिळून कोट्यावधींच्या संख्येने मराठा समाज मोर्च्यांमध्ये सहभागी झाला होता. खरे तर सरकारने या मोर्च्यांना गांभीर्याने घेऊन मराठा समाजाला पूर्वीच न्याय द्यायला पाहिजे होता. पण आता आयोगाच्या राज्यभरातील सुनावणी संपल्यावर आयोगाने तात्काळ शासनाला आपला अहवाल देवून समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने केल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.

यावेळी आयोगाला मराठा युवक, मराठा शेतकरी, मराठा नोकरदार (खाजगी क्षेत्रातील), मराठा सुशिक्षित बेरोजगार युवती, कष्टकरी महिला, घरेलू कामगार आदी विविध घटकातील शिष्टमंडळांनी निवेदने सादर केल्याचे काळे यांनी सांगितले.यावेळी हरीश भांबरे, स्वप्निल पाठक, श्रीपाद दगडे, गिरीश भांबरे, सागर काळे, अनिकेत भोर, चैतन्य मोरे, धैर्यशील कदम, संपत शेटे, भूषण देशमुख, कल्याण माने, प्रदीप नरसाळे, दिलीप भालसिंग, छायाताई भांबरे, सतिश कदम, राहुल हराळ, श्रुतिका भांबरे, योगिता काळे, स्नेहल पाठक, उषा गुंजाळ, सुमल भवर, बेबीताई भामरे, नीलम पाठक आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.