निवडणुकांमुळे शेवगावमध्ये राजकीय वातावरण तापले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्यातील या टप्प्यात दि. २७ मे रोजी होणाऱ्या १० ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू झाली असून, काही ठिकाणी भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तर काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या दोन गटांत किंवा स्थानिक आघाड्या तयार करून निवडणुका लढविल्या जात आहेत. केंद्र शासनाने १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यातजमा करण्याचा तसेच राज्य शासनाने थेट जनतेतून सरपंच निवडणे व त्यांना खर्च व इतर बाबतीत जादा अधिकारदेण्याचे महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांपेक्षा सरपंच पदाचे महत्व वाढले आहे. त्यामुळे आपापल्या गावावर वर्चस्व मिळवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी साम- दाम- दंड-भेद अशा सर्व नीतींचा अवलंब सुरू केला आहे. या निवडणुकांसाठी दि. २७ मे रोजी मतदान होत असून, १० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या १० जागांसाठी ३० तर सदस्यपदाच्या ७९ जागांसाठी १७८ उमेदवार रिंगणात आहेत शेकटे खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. प्रत्येक उमेदवाराची मतदार राजाकडे पोहचण्याची धडपड सुरू आहे. ओल्या पाट्र्यांना सुरू झाल्या असून, निवडणुका होत असलेल्या गावांतील व गावाशेजारील हॉटेल तसेच ढाब्यांवर गर्दी वाढली आहे. ग्रामपंचायत निवडणुका होत असलेल्या १० गावांपैकी तालुक्यातील आव्हाणे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे सर्वाधिक लक्ष आहे.

गेल्या सुमारे दहा-पंधरा वषांर्पासून ही ग्रामपंचायतबाजार समितीचे सभापती संजय कोळगे यांच्या ताब्यात आहे. या वेळी त्यांच्या विरोधात त्यांचे निकटचे सहकारी व भाजपच्या किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष कचरू चोथे यांनी दंड थोपटल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. आव्हाणे बु येथे सरपंचपदासाठी संजय कोळगे यांच्या भावजयी संगीता कोळगे व कचरू चोथे यांच्या पत्नी अर्चना चोथे अशी सरळ लढत असून, आव्हाणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी गटबाजी आहे. या गटबाजीचे आव्हान कोळगे कसे मोडून काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुका स्थानिक असल्याने पक्षीय राजकारणाचा फारसा प्रभाव नसतो. मात्र, उमेदवारांचा स्थानिक संपर्क महत्वाचा असतो. कोणी आपल्याला अडचणींच्या काळात मदत केली, भविष्यात कोण उपयोगी येऊ शकतो, सुख दु:खाच्या वेळी कोण धावून आले हे मुद्दे विकास कामांपेक्षाही प्रभावी ठरत असतात. त्याचप्रमाणे लक्ष्मीदर्शन ही काही ठिकाणी उपयोगी ठरते. स्थानिक पातळीवरील हेवेदावे चुकते करण्याची संधी या निवडणुकीत असते. त्यामुळेच निवडणुका होत असलेल्या गावांतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.तालुका पातळीवरील नेते व कार्यकर्ते भविष्यात कुणाचीही गरज भासू शकते म्हणून थोडी अलिप्तपणाची भूमिका ठेवत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.