पालकमंत्र्यांच्या नावाने जनता नाराज होत असल्याने त्यांची बदनामी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत जामखेड हा संयुक्त दोन तालुक्यांचा मतदारसंघ आहे. या दोन तालुक्यांना जोडणारा हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. तसेच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या जामखेडकडे जाण्याचा हा रस्ता आहे; मात्र, हा रस्ता वाहनचालकांसाठी सध्या धोकादायक झाला आहे. यामध्ये अरणगाव, पोटोदा, रत्नापूर ते जामखेड हा भाग फारच जिवघेणा झाला आहे. एक तर हा रस्ता अरुंद आहे, त्यात रस्त्याच्या साइडपट्ट्या खचल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ता तुटला आहे व खड्डेही पडले आहेत. यामुळे येथे वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच गाडी चालवावी लागते. समोरून गाडी आली तर साइडपट्ट्या खचल्याने कोणी खाली उतरत नाही. यामुळे अनेकवेळा वाहन चालकांमध्ये भांडणे होतात. दुचाकी चालकांना तर या परिसरामध्ये हमखास अपघात होतो आहे. त्यांना गाडी चालविताना कसरत करावी लागत आहे.

पालकमंत्र्यांची बदनामी
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड तालुक्यातील रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे; मात्र, हा निधी निकृष्ट कामामुळे वाया जाणार काय, असे वाटू लागले आहे. करमाळा रस्त्याचा निकृष्ट काम गाजले आहे. यामुळे नागरिकांना चांगले रस्ते मिळत नाहीत व पालकमंत्र्यांच्या नावाने जनता नाराज होत असल्याने त्यांची बदनामी होत आहे.

सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवा
हा रस्ता खराब झाल्याने अनेकांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. रस्ता खराब असल्याने अपघात होऊन कोणाला जीव गमवावा लागत असेल तर यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी जबाबदार असल्यने व ठेकेदाराचे काम निकृष्ट असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे,

पुन्हा तेच अधिकारी व तोच ठेकदार
कर्जत-जामखेड रस्त्यावर अरणगाव, पोटोदा, रत्नापूर ते जामखेड या भागामध्ये साइडपट्ट्या व दुरुस्ती या नावाखाली मागील वर्षीच मोठी रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाने खर्च केली आहे. हे काम सुरू असतानाच ते निकृष्ट असल्याच्या तक्रारी नागरिक करीत होते; मात्र, याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे हे काम होताच काही दिवसांतच साइडपट्ट्या राहिल्या नव्हत्या. या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे पुन्हा तेच अधिकारी व तोच ठेकदार आणि नवीन खर्च हे चक्र सुरू आहे. यामुळे मागील खर्चाची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.