विवाहितेच्या खून प्रकरणी माजी सरपंच सासरा व पतीस जन्मठेपेची शिक्षा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील हिवरे झरे येथील विवाहितेच्या खूनप्रकरणी गावचे माजी सरपंच व सासरा शिवाजी विठोबा काटे व पती नवनाथ शिवाजी काटे यांना जन्मठेप तर माजी सरपंच सासू पार्वतीबाई शिवाजी काटे यांना न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 


या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल ॲड. अनिल डी.सरोदे यांनी काम पाहिले.या खटल्याची माहिती अशी की, दि. ९/३/२०१६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विवाहिता मयत सारिका नवनाथ काटे (रा.हिवरे झरे, ता.नगर) हिस 'तू गरीब घरची आहेस' व इतर किरकोळ भांडणाचे कारणावरुन सासरे शिवाजी काटे यांनी मारहाण करून तिचे अंगावर रॉकेल ओतले.

यावेळी तिचा पती नवनाथ शिवाजी काटे याने पेटवून दिले. यावेळी मयत सारिका हिची सासू पार्वतीबाई काटे तिला शिवीगाळ करीत होती. या घटनेत सारिका गंभीररित्या भाजल्याने तिला नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे तिचा विशेष कार्यकारी दंडाधिकारी व पोहेकॉ. वाघ यांनी मृत्यूपूर्व जबाब नोंदविला.

त्याआधारे नगर तालुका पोलिस ठाण्यात भादंवि ३०७/३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु उपचारादम्यान सारिका हिचा मृत्यू झाल्याने नवरा, सासू, सासरा यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०२/३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आर.ए. परदेशी यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

दोघेही माजी सरपंच !
या खटल्यातील आरोपी व मयतेचा सासरा शिवाजी विठोबा काटे व त्याची पत्नी तसेच मयताची सासू पार्वतीबाई शिवाजी काटे हे दोघे नगर तालुक्यातील हिवरे झरे या गावचे माजी सरपंच होते तर मयताचा पती नवनाथ शिवाजी काटे हा माजीमंत्र्यांच्या गाडीचा ड्रायव्हर होता. त्यामुळे सदर खटल्यात तपास करण्याचे मोठे आव्हान होते. तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक परदेशी यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यामुळे मयत सारिकाला न्याय मिळाल्याची भावना अतिरिक्त सरकारी वकिल ॲड. अनिल डी. सरोदे यांनी व्यक्त केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.