पारनेर तालुक्याला रस्त्यासाठी पन्नास लाखांचा निधी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ ते गाजदिपूरला जोडणाऱ्या रस्त्यासाठी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागामार्फत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार विजय औटी यांनी दिली.

गाजदिपूर हे गाव शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले दुर्गम गाव असून गावात किराणा दुकान अथवा पिठाची गिरणीही नाही. परिणामी दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी आदिवासी बांधवाना पायपीट करून वडगाव सावताळ येथे यावे लागते. कारण स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी या दुर्गम गावस जोडणाऱ्या रस्त्याचे कामच झालेले नव्हते.

आमदार विजय औटी यांनी या गावास भेट देऊन आदिवासींच्या भावना समजून घेतल्या असता वडगाव सावताळला जोडणाऱ्या रस्त्याची मागणी येथील आदिवासींनी केली. औटी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्यानंतर रस्त्याचा बराच भाग वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याची बाब पुढे आली. आदिवासी बांधवांच्या व्यथा दूर करण्याच्या उद्देशाने आमदार विजय औटी यांनी या रस्त्याची परवानगी तसेच निधीसाठी वन विभागाकडे मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू केला. 

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेळोवेळी भेट घेऊन या प्रस्तवाची फाइल वन विभागाच्या मुख्य सचिवांपर्यंत कशी पोहचेल याची काळजी घेतली.सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर गुरुवारी सकाळी आमदार औटी, जिल्हा परिषदेचे सदस्य काशीनाथ दाते, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनी मंत्रालयात मंत्री मुनगंटीवार यांची भेट घेऊन रस्त्याच्या मंजुरीबाबत चर्चा केली. मुनगंटीवार यांनी माहिती घेतल्यानंतर वन विभागाच्या मुख्य सचिवांना निधी मंजुरीचे आदेश दिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.