शहर भाजपअंतर्गत गांधी - आगरकर वाद पुन्हा उफाळला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : मागील दोन महिन्यांपासून थंडावलेला शहर भाजपअंतर्गत भिंगार-केडगाव मंडलाध्यक्ष वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर समर्थक मानले जाणारे भिंगारचे मंडलाध्यक्ष महेश नामदे व केडगावचे मंडलाध्यक्ष साहेबराव विधाते यांनी थेट प्रदेश भाजप कार्यालयासमोरच उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी गटाची याबाबतची भूमिका उत्सुकतेची आहे.

नगर शहर भाजपमध्ये गांधी-आगरकर गटांतील वाद सर्वश्रुत आहेत. आगरकरांच्या काळात नगर शहरात चार स्वतंत्र मंडले निर्माण केली गेली. सावेडी, केडगाव, भिंगार व मध्य नगर शहर या चार नव्या मंडलांपैकी आगरकरांच्या काळात सावेडी, केडगाव व भिंगारचे मंडलाध्यक्ष निवडले गेले. खासदार गांधी यांनी मध्य नगर शहर मंडलाध्यक्ष निवडला, पण या चार निवडींपैकी भिंगार व केडगावच्या मंडलाध्यक्ष निवडी वादात सापडल्या आहेत.

आगरकरांच्या काळात निवडले गेलेले भिंगारचे मंडलाध्यक्ष महेश नामदे व केडगावचे मंडलाध्यक्ष साहेबराव विधाते यांना बरखास्त करून त्यांच्या जागी अनुक्रमे शिवाजी दहीहंडे व शरद ठुबे या आपल्या समर्थकांची वर्णी गांधी यांनी लावली आहे. पण जुन्यांची बरखास्ती व नव्यांची नियुक्ती मागील पाच-सहा महिन्यांपासून वादात सापडली आहे. आता हा संघर्ष पराकोटीला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भिंगारचे मंडलाध्यक्ष नामदे व केडगावचे मंडलाध्यक्ष विधाते यांच्या बरखास्तीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मागील १३ मार्चला स्थगिती दिली होती. मात्र, त्यानंतर खासदार गांधी गटाने आक्रमक भूमिका घेतल्याने तीनच दिवसांत ही स्थगिती रद्द केली गेली. त्यानंतर तब्बल दोन महिने हा मंडल वाद थंडावला होता. आगरकर व गांधी गटाकडून कोणतीही पत्रकबाजी वा आरोप-प्रत्यारोप झडले नाहीत. मात्र, आता अचानक नामदे व विधाते यांनी थेट प्रदेशाध्यक्ष दानवेंनाच पत्र पाठवून प्रदेश भाजप कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.