नगरमध्ये चोरी व घोरफोडी सत्र सुरूच, तीन लाखांचा ऐवज लंपास.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरात चोरी व घरफोडीची सत्र सुरूच असून पुणे बसस्थानक परिसर, सारसनगर, विळदघाट व लिंक रोड परिसरात चोरी व घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जवळपास तीन लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून या प्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार दि. १२ रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास पुणे बसस्थानक परिसरात सुजाता अशोक पवार (वय ५२, रा. सेल कॉलनी, टिळकनगर, मुंबई) यांच्या पर्समधील १ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या अज्ञात चोराने चोरून नेल्या असून या प्रकरणी सुजाता पवार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत सारसनगर परिसरातील विधाते निवास कॉम्प्लेक्स येथे सचिन विनायक पाटील (वय ३४) यांच्या घराचा कडीकोयंडा अज्ञात चोराने तोडून घरातील १५ हजाराची रोख रक्कम, दोन सोन्याचे अंगठ्या असा जवळपास ५० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात अली असून पुढील तपास पो. ना. पानसरे हे करीत आहेत.

तिसऱ्या घटनेत विळद घाट परिसरातील डॉ. विखे पाटील हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर साय्यक दिनेश भास्कर काळे यांच्या राहत्या घरातून २५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने व दोन मोबाईल असा ऐवज अज्ञात चोरांनी शनिवार दि. १२ रोजी रात्रीच्या सुमारास चोरून नेला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. हे. कॉ. शेख हे करीत आहेत.

शहरातील लिंक रोड परिसरात राहणाऱ्या राहुल भास्कर शिंदे (वय ३५) या वाहन खरेदी-विक्रीचे काम करणाऱ्या युवकाने विक्रीसाठी आणलेल्या निसान कंपनीच्या कारचे चार हजार रुपये किंमतीचे दोन लोगो चोरून नेण्यात आले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास स. फौ. शिंदे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.