नगराध्यक्ष वहाडणे यांच्याबाबत कोपरगावच्या जनतेचा दीड वर्षातच भ्रमनिरास झाला !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगावच्या जनतेला वाटले होते नगराध्यक्षपद मिळाल्यावर विजय वहाडणे यांच्यातील कडवटपणा कमी होईल, परंतु या बाबतीत जनतेचा दीड वर्षातच भ्रमनिरास झाला, अशी टीका उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी पत्रकाद्वारे केली. 


पत्रकात म्हटले आहे, मागील पाच वर्षे वहाडणे हे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचा कारभारी म्हणून काम पहात होते. सुरुवातीची अडीच वर्षे सुरेखा राक्षे नगराध्यक्ष असताना शहराचा सर्व कारभार कोल्हे यांनी मोठ्या विश्वासाने वहाडणेंकडे सोपवला होता. हे एक प्रकारे घटनाबाह्य सत्ताकेंद्रच होते. त्यावेळी वहाडणे यांना कोल्हे कुटुंबाबद्दल अतिशय जिव्हाळा होता.

राजकीय टीकाटिप्पणी झाली, तर वहाडणे यांना खूप वाईट वाटायचे. हे प्रेम एवढे पराकोटीचे होते की, अडीच वर्षांनंतर नगराध्यक्ष बदलण्याच्या वेळेस भाजप-सेना युतीचा नगराध्यक्ष व्हावा, म्हणून वहाडणे यांच्याबरोबर एक नगरसेवकाचे मतदान युतीच्या उमेदवारास व्हावे, म्हणून त्यावेळेच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्वतः वहाडणे यांना सांगूनही कोल्हेंच्या प्रेमापोटी त्यांनी भाजप-सेना युतीच्या उमेदवारास मतदान करण्याचे नाकारले होते.

मग आजच अचानक असे काय घडले की, कोल्हे परिवार त्यांना एवढा वाईट का वाटायला लागला. राजकीय विरोधक म्हणून आमदारांच्या कामकाजावर जरूर टीका करावी, परंतु ती खालच्या पातळीवर जाऊन करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. महिला प्रतिनिधी, महिला अधिकारी यांच्यावर कायमच खालच्या पातळीवर जाऊन बोलतात हीच का तुमची संस्कृती. मी स्वतः साव, बाकी सगळे राजकीय कार्यकर्ते चोर असे तुम्हाला वाटते. आपल्याला वाळूमध्ये मलिदा मिळतो, असा आरोप नगराध्यक्ष वहाडणे यांनी केला.

मला माता-पित्याची शपथ घ्यायला लावता. ती आपण घेऊच, परंतु नगराध्यक्षांनी त्यांच्या चिरंजीवांना शपथ घ्यायला सांगावे. आपल्या मुलाने शिवपुतळ्याच्या प्रांगणात बाॅडी शो भरवला होता. त्यासाठी जो खर्च लागला तो कुठून आला? आपल्या व कोल्हे परिवारात अविश्वास निर्माण व्हावा, म्हणून नगराध्यक्ष आपल्या विरुध्द नको ती गरळ ओकून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला, तरी कोल्हे कुटुंबीयांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. पण तुमच्या या विध्वंसक प्रवृत्तीचा आपण जाहीर निषेध करतो. सध्या नगरपालिकेत काय चालू आहे, हे सर्व जनता पहात आहे, असे उपनगराध्यक्षांनी पत्रकात म्हटले आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.