प्रवरा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह २२ तासानंतर सापडला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील संजय सुदाम खताळ हा ३३ वर्षीय तरुण प्रवरा नदीपात्रात रविवार दि. १३ मे रोजी दुपारी ३ वाजता आंघोळ करण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरुन पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह सोमवार दि.१४ मे रोजी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास प्रवरा नदीपात्रात २२ तासानंतर सापडला आहे. 


याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धांदरफळ खुर्द येथे संजय खताळ हा तरुण राहत होता. गावातील आपल्या मित्रांसोबत तो रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रवरा नदीवर पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी पाय घसरुन तो पाण्यात पडला; मात्र त्याला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला. संजय हा पाण्यात बुडाल्याची माहिती गावातील तरुणांना समजताच त्यांनी त्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह मिळून आला नाही. त्यामुळे शेवटी सोमवारी अहमदनगर येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या पथकास पाचारण करण्यात आले. 

या पथकातील जवानांनी, गावातील तरुणांनी व पोलिसांनी सकाळपासूनच मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. अथक प्रयत्नानंतर दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास मृतदेह सापडला. याप्रकरणी सतिश दत्तात्रय कोकणे यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बाळू घोडे हे करत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.