पूर्ण ताकदीने विधानसभा लढविण्याची नागवडे कुटुंबाची तयारी - राजेंद्र नागवडे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहे. नागवडे किंवा आ. जगताप कुटुंबातील उमेदवार असेल. यावेळी पूर्ण ताकदीने विधानसभा लढविण्याची नागवडे कुटुंबाची तयारी आहे. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे मिळून जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य होईल, अशी माहिती नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.

मागील विधानसभा निवडणुकीत नागवडे कुटुंबाने राहुल जगतापांना आमदार करण्यात मोलाचे योगदान दिले. यावेळीही एकत्र राहून निर्णय घेऊ. मात्र, आता आमची बारी, असा सूचक इशारा देत 'नागवडे' कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी विधानसभा उमेदवारीवर अप्रत्यक्ष दावेदारी सांगितली. नगरपालिका व विधानसभा निवडणुकांबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचे जेष्ठ मंडळी घेतील तो निर्णय मान्य करू, असेही ते म्हणाले.

तुळशीदास मंगल कार्यालयात नागवडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती अरुण पाचपुते होते. राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवजीराव नागवडे, संपतराव म्हस्के, जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, अप्पासाहेब शिंदे, नगराध्यक्ष मनोहर पोटे, उपनगराध्यक्ष अर्चना गोरे, सुरेखा लकडे, अंजली रोडे, दिनकर पंधरकर, जिजाबापू शिंदे, अनिल पाचपुते, गणपतराव काकडे, संजय जामदार, प्रशांत दरेकर आदी उपस्थित होते. 

राजेंद्र नागवडे म्हणाले, पाणीप्रश्नात राजकारण करून जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणारा 'नागवडे' कारखाना एकमेव आहे. 

आमदार राहुल जगताप म्हणाले, नागवडे कुटुंबीयांनी नेहमी सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून काम केले. ग्रामीण भागात सहकार व शिक्षणाचे जाळे निर्माण केले. तालुक्याच्या सर्वांगीण विकासात नागवडे कुटुंबाचे बहुमोल योगदान आहे. 

डॉ. संजय कळमकर म्हणाले, जिल्ह्यात राजकारण करणे सोपे काम नाही. कार्यकर्ते दिशाहीन झाले असल्याने कार्यकर्ता शिबिर घेणे गरजेचे बनले आहे. ग्रामीण भागात सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगाचा 'इव्हेंट' केला जात आहे, तसेच समाज प्रलोभनांना बळी पडत आहे, ही बाब चिंताजनक असल्याचे कळमकर यांनी म्हटले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार म्हणाले, तालुक्याच्या विकासात नागवडे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. सध्या विकासाचा बट्ट्याबोळ झाला आहे, केवळ सोशल मीडियावर विकासाच्या गप्पा रंगत आहेत.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.