लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे जनतेची सेवा करण्याचा वसा घेतला - डॉ. सुजय विखे पाटील

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राजकारण हा आमचा व्यवसाय नाही, लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकत नाहीत. जिल्ह्यात दिवसा ढवळया खून पडत आहेत. आपण जिल्ह्यात सुसंकृतपणा आणण्याचे काम हाती घेतले असून, समाजकारणाचा वसा अखंडपणे सुरू ठेवू, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. 


भगवान विद्यालयात जनसेवा फाउंडेशन व डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज विळद घाट, अहमदनगर यांच्या विद्यमाने आयोज़ित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख उपस्थित येळेश्वर संस्थानचे महंत हभप रामगिरी महाराज, तुळजा भवानी संस्थानचे महंत हभप संतोष महाराज खताळ, पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, उपाअध्यक्ष विश्वंभर थोरे, तालुकाध्यक्ष प्रतीक खेडकर,अल्पसंख्याक अध्यक्ष नासिर शेख, मनसे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर आदी उपस्थित होते.

खरवंडी कासार ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने उपसरपंच शरद दहिफळे यांनी डॉ. विखे यांचा या वेळी सन्मान केला. या वेळी डॉ. विखे म्हणाले, आगामी काळात जनसेवा फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांचे प्रश्न, दूध भावाचे प्रश्न, बेरोजगार, युवा वर्ग, पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठे आंदोलन हाती घेतले ज़ाईल. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहोत. राजकारण हा आमचा व्यवसाय नाही, लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे जनतेची सेवा करण्याचा वसा आम्ही घेतला आहे. आम्ही पळून जाणारे प्रतिनिधी नाहीत, परिस्थितीनुसार तुम्हाला असे लोकप्रतिनिधी पहावयास मिळाले.

विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. गावागावांतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम आम्ही करणार आहोत. सध्या साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची सर्वात वाईट परिस्थिती आहे. त्यापेक्षा अनुदानित शिक्षक वर्ग चांगला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकारणाच्या वेळी राजकारण करू, त्यावेळी टीकटीण्णी करू, राजकारणातील सर्व लोकप्रतिनिधी माझे वडिलधारी आहेत. योग्य वेळी योग्य बोललेलं बरं ठरेल.

 डॉ. विखे यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. अनेक व्यावसायिकांनी विखे यांचा सन्मान केला. शिबिरामध्ये १९६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. २०५ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी निवडले आहेत. डॉ. विखे यांनी श्रीक्षेत्र भगवान गड येथे जाऊन राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन भगवान गडाचे महंत हभप डॉ. नामदेव शास्त्री यांचे आशीर्वाद घेऊन महंतांचा सन्मान केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.