दूध भावाच्या प्रश्नावर राहुरी तालुक्याचे आमदार गप्प का ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : दुधाचे रतिब घालता घालता पाच वेळा आमदारकी, दोन वेळा मंत्रीपद मिळवले असे भूषणाने जाहीर भाषणात सांगणारे तालुक्याचे आमदार सत्ताधारी पक्षात असुनही राज्यात दुधाचे भाव घसरलेले असताना या प्रश्नावर गप्प का? असा सवाल नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केला.नगराध्यक्ष तनपुरे हे वांबोरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शाखेचे व क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, वांबोरीचे माजी सरपंच किसन जवरे, संभाजी मोरे, गोरक्षनाथ वेताळ, शंकरराव मोरे, ॲड. ऋषिकेश मोरे, बाबासाहेब सोनवणे, अनिल पटारे, अंजिराम मोरे, नितीन नवले, कान्हू मोरे, धीरज पानसंबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

नगराध्यक्ष तनपुरे म्हणाले, देशात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने सत्तेवर येताना निवडणुकीत अनेक आश्वासने दिली. 'अच्छे दिन'ची स्वप्ने दाखवली गेल्या चार वर्षांत कोणाला 'अच्छे दिन' आले हा खरा प्रश्न आहे.ग्रामीण भागातील विचारसरणीचे हे सरकार नसल्याचेच दिसते. आज शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतमालाला बाजारभाव नाहीत. दुधाचे भाव १७ रुपये लिटर, कांद्याला व उसाला साखरेमुळे भाव नाही. भाजीपाला कवडीमोल भावाने विकावा लागतो ही वस्तुस्थिती असून आज प्रत्येकाला पक्षाध्यक्ष शरद पवाराची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 

केंद्रातील व राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारचे काम व आजचे सरकारचे काम जनतेसमोर आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी करण्यासाठी गावोगाव संघटना स्थापन करून प्रत्येक बुथवर राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा स्थापन करणे,पक्षाची ध्येयधोरणे जनतेसमोर मांडणे आदी कामे युवक संघटनेमार्फत करायची आहे. तालुक्यात गेली १३ वर्षे भाजपचे आमदार असताना कोणती कामे झालीत. उलट माजी आ. प्रसाद तनपुरे यांनी या तालुक्यात अनेक विकास कामे केली आहेत. त्यांच्या नंतर या तालुक्यात १३ वर्षांत विरोधी आमदरांनी काय कामे केली. 

वांबोरी चारीच्या शासकीय लिप्टची कामे आघाडी सरकारच्या काळात झाली असून आता दोन महिन्यापूर्वी वांबोरी चारी येथे दोन-तीन आमदारांच्या उपस्थितीत पाणी सोडण्याचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला. किती तळे भरले, किती पाणी या भागाला मिळाले असे प्रश्न करीत आमदारांनी तालुक्यातील प्रश्नावर किती वेळा विधानसभेत आवाज उठवला. 

येथील शासकीय लिप्ट सुरु करण्यास प्रसाद शुगरच्या माध्यमातून करण्यात आलेली मदतीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. दूध घालता घालता आमदार झालो,मंत्री झालो असे सांगणारे आमदार आज राज्यात दुधाच्या भावाच्या प्रश्नावर दूध उत्पादक आंदोलन होत असताना तालुक्याचे आमदार भाजपचे ज्येष्ठ आमदार असतानाही या प्रश्नावर गप्प का? असा सवाल तनपुरे यांनी केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.