राजकीय फायद्यासाठी नव्हे तर लोकांच्या सोयीसाठी संगमनेर जिल्हा व्हावा - आ. वैभव पिचड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्यातील आदिवासी लोकांचे अहमदनगर येथे काही काम असल्यास दोनशे ते अडीशे किलोमीटर अंतर जावे लागते. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होतात. म्हणून राजकीय फायद्यासाठी नव्हे तर लोकांच्या सोयीसाठी संगमनेर जिल्हा व्हावा अशी आग्रही मागणी अकोले तालुक्याचे आमदार वैभवराव पिचड यांनी केली. 

संगमनेर येथे जिल्हा कृती समितीच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरु असून हे उपोषण आज ४१ दिवशीही सुरु आहे. या जिल्हा कृती समितीला आ.वैभव पिचड यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा कृती समितीच्या स्वाक्षरी नोंदणी वहीवर आपला अभिप्राय देत स्वाक्षरी करत संगमनेर जिल्ह्याला जाहिर पाठिंबा दिला.

आ.पिचड म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तालुक्यांचा जर अभ्यास केला तर संगमनेर हा सर्वांत मोठे क्षेत्रफळ असणारा तालुका असून त्यानंतर अकोले तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. जिल्ह्याचे विभाजन झाल्यास संगमनेर व अकोले तालुक्यातून आणखी एकएक तालुक्याची निर्मिती करण्यात येणार आहे. संगमनेर जिल्ह्यासह इतरही तालुके जिल्हा करण्याची मागणी करत असले तरी संगमनेर हे अकोले तालुक्यासह आजूबाजूच्या सर्वच तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे.

त्यामुळे नगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास संगमनेरच जिल्हा करावा अशी मागणी आ.पिचड यांनी यावेळी केली. यावेळी संगमनेर जिल्हा कृती समितीचे अमोल खताळ, राजेश चौधरी, शरद नाना थोरात, राजेंद्र देशमुख, अमर कतारी, प्रशांत वामन, लक्ष्मीकांत दसरे, नरेश माळवे, कपिल पवार, शौकत जहागिरदार, शाम कर्पे, रऊफ शेख, पप्पु कानकाटे, मनिष माळवे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.