शेवगावात चोरट्यांचा धुमाकूळ, दहा लाखांचा ऐवज लांबविला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्यातील हसनापूर व कोळगाव येथे घरातील व्यक्ती गच्चीवर झोपलेल्या असताना अज्ञात चोरटयांनी घरात शिरून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, कपडे , असा सुमारे दहा लाखांचा ऐवज चोरून नेल्यामुळे खळबळ उडाली आहे. हसनापूर येथे माजी सरपंच अर्जुन विष्णू ढाकणे यांच्या तर कोळगाव येथे महिंद्रा आसाराम झिरपे व प्रल्हाद सर्जेराव झिरपे यांच्या घरी ही चोरी झाली. 


हसनापूर व कोळगाव ही दोन्ही गावे शेजारी असून, केवळ एक किमीचे अंतर आहे. या घटना शनिवार, दि.१२ रोजी रात्री १२ ते रविवारी पहाटे ४ या वेळेत घडल्या. अर्जुन ढाकणे हे शनिवारी रात्री ९ वा. जेवण झाल्यानंतर कुटुंबीयांसमवेत घराच्या गच्चीवर झोपण्यास गेले. रात्री बारा वाजेपर्यंत ते जागे होते. पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या मातोश्री खाली आल्या असता, घराच्या आवारात मोकळया सुटकेस पडलेल्या दिसल्या. 

त्यांनी श्री. ढाकणे यांना बोलावले, त्यावेळी घरातील कपाटे व अन्य वस्तूंची उचकापाचक करून चोरटयांनी सुमारे २२ तोळे सोन्या-चांदीचे दागिने, दीड लाख रुपये रोख, कपडे चोरून नेल्याचे निदर्शनास आले. कोळगाव येथेही महिंद्रा आसाराम झिरपे हे घराच्या गच्चीवर झोपले असताना चोरटयांनी जिन्याने घरात प्रवेश करून दागिने व रोख रक्कम, असा ७९ हजारांचा ऐवज चोरून नेला तर त्यांच्या घरासमोर राहणारे त्यांचे चुलत बंधू यांच्या घरातही अशाच पद्धतीने प्रवेश करून चोरटयांनी २७ हजार रुपयांचा ऐवज नेला. 

विशेष म्हणजे श्री. ढाकणे हे हसनापूर येथे व झिरपे हे कोळगाव येथे भरवस्तीत गावठाणात राहतात. चोरटयांनी भरवस्तीत जाऊन अशी हिम्मत केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. अर्जुन ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.