अनिता ठुबे व सुनिता कोतकर यांची प्रकृती खालावली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचा तपास पोलिसांकडून योग्य रितीने होत नसल्याचा आरोप करुन या गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेसाठी मयत कोतकर व ठुबे कुटूंबियांनी शनिवारी (दि. १२) सकाळी ११ वा. पासून केडगाव येथे मयत संजय कोतकर यांच्या निवासस्थानी उपोषण सुरु केले असून रविवारी (दि.१३) उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मयत संजय कोतकर यांच्या पत्नी सुनिता व मयत वसंत ठुबे यांच्या पत्नी अनिता यांना अशक्तपणामुळे चक्कर येवू लागल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. 


यावेळी जिल्हा रूग्णालयाचे पथक तपासणीसाठी दाखल झाले होते. हत्येचा कट रचणाऱ्यांना व ज्यांनी खून केला त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर व त्यांचे सासरे भानुदास कोतकर यांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही उपोषणकर्त्यांनी केली आहे. 

मृत संजय कोतकर यांचा मुलगा व या घटनेतील फिर्यादी संग्राम कोतकर, सुनीता कोतकर, मृत वसंत ठुबे यांची पत्नी अनिता ठुबे, भाऊ प्रमोद ठुबे यांच्यासह नातेवाइक उपोषणाला बसले आहेत. रविवारी सायंकाळी उपोषणकर्त्यांबरोबर पोलिस निरीक्षक सुरेश रत्नपारखी यांनी चर्चा केली. या वेळी शिवसेनेचे दक्षिणप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगरसेवक योगिराज गाडे, सचिन जाधव आदी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यास आंदोलन मागे घेऊ, असे कुटुंबीयांचे म्हणणे होते.

---------------------------

-----------------------
Powered by Blogger.