शेतकऱ्यांनी शेतकरीविरोधी शक्तींवर मतदानाचा वार करून हद्दपार करा - आ. बच्चू कडू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जातींच्या राजकारणावर दंगली घडत ​असताना शेतकऱ्यांनी शेतकरीविरोधी शक्तींवर मतदानाचा वार करून हद्दपार करावे,असे आवाहन शेतकरी नेते आ. बच्चू कडू यांनी येथे केले. येथील आनंद लॉनवर पार पडलेल्या भुमिपुत्र शेतकरी संघटनेच्या प्रथम वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी किसान सभेचे डॉ. अजित नवले​ होते.या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य प्रवक्ते अनिल देठे ,राज्य सचिव किरण वाबळे, राज्य संघटक धनंजय कोरडे, असिफ शेख, सबाजी गायकवाड, गुलाबराव डेरे, संजय वाघमारे, मार्तंड बुचुडे, शंकर नगरे, ॲड. राहुल झावरे, दिनेश औटी, आदिनाथ पायमोडे, सचिन सैद, दत्ता आवारी, रामराव गाडेकर, ॲड. गणेश कावरे आदी उपस्थित होते.​

भाजप सरकारवर कडाडून हल्ला करताना आ. कडू म्हणाले, ज़ातीचे राजकारण करून मते मागता येतात, दंगलीत मृत्युमुखी पडलेल्यांना मदत होते; परंतु राज्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांना कुठळीच मदत मिळत नाही, त्यामुळे आता शेतकरी सर्व संघटना एकत्र आणून एल्गार करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी या वेळी केले. 

दूध प्रश्नाविषयी बोलताना दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकार यांच्यावर हल्ला चढवताना दूध भुकटीला अनुदान देताना एक रुपया कुणाच्या खिशात गेला, हे जाणणे गरजेचे आहे. सध्या दोनच जाती असून, एक इनामदार व दुसरी बेईमानांची. या बेईमानांना ​मोडून काढण्यासाठी मतदानाचा वार करून शेतकऱ्यांनी शेतकरीविरोधी शक्तींना हद्दपार करावे. शेतकऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून गाई व म्हशींचे वाटप करण्याची गरज या वेळी त्यांनी बोलून दाखवली. 

डॉ. अजित नवले म्हणाले, मागच्या शेतकरी संपाला १ जून रोजी एक वर्ष होत असताना सरकारने शेतकरीविरोधातील धोरण तसेच चालू ठेवल्याने शेतकरी संपाच्या वर्धापनदिनी (१ जूनला) दूध व शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन एल्गार करण्याचा इशारा त्यांनी दिला. याबाबत लवकरच पुणतांबा येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येईल. सरकारने दुधाला दरवाढ न देता भुकटीला अनुदान देऊन भ्रष्टाचाराचा नवा मार्ग शेाधून काढला आहे. 

या वेळी संघटनेच्या वतीने डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी,कांदा पिकाला दोन हजार हमीभाव मिळावा,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास प्रत्येकी दहा लाख रुपये मदत देऊन घरातील एकाला शासकीय नोकरी मिळावी, दुधाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, 12 तास मोफत वीज मिळावी,शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे व वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावे, आदी प्रश्नांवर भुमिपुत्र संघटनेच्या वतीने लढा सुरूच ठेवणार असल्याचे अनिल देठे यांनी या वेळी सांगितले. 

Powered by Blogger.