शेततळ्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कृषी विभागाकडून शेततळयाचे पैसे न मिळाने कोठेवाडी येथील बाळू साहेबराव चोथे (वय-४० वर्षे) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. शनिवारी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेहावर कोठेवाडी येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 


तालुका कृषी विभागाने शेततळयाचे पैसे दिले नसल्याने तसेच पाण्याअभावी शेतातील डाळिंबाची बागजळायला लागल्याने बाळू चोथे यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचा भाऊ बंडू चोथे यांनी सांगितले. बाळू व आई-वडील कोठेवाडीत राहत होते. डाळिंबाची चारशे झाडे आहेत. बागेला पाणी मिळावे, यासाठी शेततळे खोदले. शेततळ्याचे अकुशल कामाचे पैसे मिळाले. मात्र, कुशल कामाचे ७८ हजार रुपयांचे बिल गेल्या दीड वर्षापासून मिळाले नाही. 

काम पूर्ण झाले. राहिलेले पैसे मिळण्यासाठी चोथे यांनी कृषी विभागाच्या कार्यालयात अनेकवेळा चकरा मारल्या तरी पैसे दिले नाही. तालुका कृषी विभागाने शेततळे पूर्ण होऊनही पैसे दिले नसल्याने मी अडचणीत सापडलो आहे. आता मला काहीच मार्ग दिसत नाही. डाळिंबाची बाग डोळयासमोर पाण्यावाचून जळून चालली आहे. घरातच काही तरी करतो, असे बाळू यांनी तीन दिवसांपूर्वी वडिलांना सांगितले होते.

वडिलांनी त्याला सबुरीचा सल्ला दिला होता. शुक्रवारी रात्री चोथे कुटुंब जेवण करून झोपले. बाळू घरात तर आई-वडील बाहेर अंगणात झोपले होते. शनिवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर बाळूचा मृतदेह घराच्या छताला लटकलेला दिसला. पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविचेछदन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.