अहमदनगर महानगरपालिकेत कायद्याचे राज्य संपून भ्रष्टाचार व अनागोंदी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेत आयुक्त, दोन उपायुक्त, मुख्य लेखाधिकारी, नगर सचिव व शहर अभियंता असा कोणताही सरकारी अधिकारी कामावर नसल्यामुळे शहराचे कामकाज विस्कळीत झाले आहे. यामुळे कायद्याचे राज्य संपून भ्रष्टाचार व अनागोंदी माजल्याचा आरोप करित तातडीने महापालिकेवर प्रशासक नेमण्याची मागणी पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.


गेल्या महिन्यात झालेल्या केडगावच्या पोटनिवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीनंतर दुहेरी हत्याकांड घडले व राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना हा वाद उफळला. यावरुन शहर हे दहशत शासित असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम महापालिकेच्या प्रशासनावर झालेला आहे. मनपा आयुक्त घनश्याम मंगळे हे बदली होवून कार्यभार सोडून गेले. त्यांच्या जागी नवीन नियुक्ती झालेली नाही. तर दोन उपायुक्तांच्या जागा बर्‍याच दिवसापासून रिकाम्या आहेत. 

करविभाग हेडक्लर्क कोंडा पाहत आहे. नगर सचिवपद व शहर अभियंता पद देखील रिक्त आहे. मुख्यलेखाधिकारी हे पथदिव्या घोटाळ्यात अडकल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेत बेकायदेशीर कामे तातडीने होवू लागली आहेत. तर कायदेशीर कामासाठी नागरिक रांगेत उभे रहावे लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

महापौर पद हे प्रशासकीय नसल्याने महापालिका कारकुनांच्या ताब्यात गेलेली असून, कायद्याचे राज्य संपलेले आहे. यामुळे महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढून, सर्व सामान्य नागरिकांचे जीवन कष्टमय झालेले आहे. शहरात सर्वत्र कचरा झाला आहे. घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवून मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरात वाढलेली गुंडागर्दी व महापालिकेतील सर्व जबाबदार अधिकारी एकाच वेळी गायब झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार कोलमडून पडलेला आहे. 

हजारो नागरिकांचा असंतोषाचा उद्रेक होवून त्यांना रस्त्यावर आनण्याची वेळ न पाहता तातडीने महापालिकेवर प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या आयुक्त पदची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्याकडे असून, सर्वात मोठा जिल्हा असलेल्या प्रशासनाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना महापालिकेच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवण्यासाठी वेळ नसणार असल्याचे देखील निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.