विडी कामगारांना जीएसटीचा फटका पन्नास टक्के रोजगार बुडाला असताना, बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विडी विक्रीवरील 28 टक्के जीएसटीमुळे विडी कामगारांच्या रोजगारावर संकट आले असताना विडी विक्रीवरील 28 टक्के जीएसटी कमी करुन 5 टक्के जीएसटी आकारण्याची मागणी महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा व नगर विडी कामगार संघटनेच्या (आयटक, इंटक) वतीने करण्यात आली. 


या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार महेंद्र पाखरे यांना देण्यात आले. यावेळी कॉ.शंकर न्यालपेल्ली, शंकरराव मंगलारप, कॉ.कारभारी उगले, कॉ.सुधीर टोकेकर, व्यंकटेश बोगा, चंद्रकांत मुनगेल, कविता मच्चा, शारदा बोगा, सरोजनी दिकोंडा, लिलाबाई भारताल, ईश्‍वरी सुंकी आदिंसह विडी कामगार महिला उपस्थित होत्या.

1 जुलै पासून देशात जीसटी ही एकच कर प्रणाली लागू करण्यात आली. विडी विक्रीवर 28 टक्के जीएसटी लागू करण्यात आलेले आहे. यापुर्वी महाराष्ट्रात विडी विक्रीवर साडे बारा टक्के व्हॅट लागू होता. जीएसटीमुळे 15.50 टक्के ज्यादा भरावे लागत असून, याचा परिणाम विडी विक्रीवर झालेला आहे. मर्यादेपेक्षा जास्त कर लादल्याने छोटे दुकानदार, व्यापारी विडीवर रक्कम गुंतविण्यास तयार नाही. विडी विक्री होत नसल्याने विडी कारखानदारांनी विडी कामगारांच्या कामात सुमारे पन्नास टक्के पर्यंन्त कपात केली आहे. 

यामुळे विडी कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहे. हीच परिस्थिती राहिल्यास विडी उद्योगातील छोटे कारखानदार हा धंदा बंद करणार आहेत. यामुळे विडी कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळून उपासमारीची वेळ येणार आहे. विडी कामगारांना एक हजार विडी बनविल्यानंतर 156 रु. मिळतात तर एक हजार विडीवर 168 रुपये जीएसटी कर लावला जातो. विडी कामगारांच्या मजुरीपेक्षा अधिक कराची रक्कम असून, विडी वरील 28 टक्के जीएसटी हे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

विडी कामगार हे दुर्बल घटकातील असून, यामध्ये 90 टक्के महिला आहेत. तसेच विडी ओढणारे देखील सर्वसामान्य नागरिक, कामगार व शेतमजुर आहेत. विडी व्यवसायावर विडी कामगारांचे रोजगार अवलंबून आहे. हे रोजगार बुडाल्यास सध्याच्या परिस्थितीत विडी कामगारांना पर्यायी रोजगार मिळणे देखील कठिण असून, त्यांचा संसार उघड्यावर येण्याची शक्यता आहे. 

याबाबत केंद्र व राज्य सरकारने विचार करुन विडी विक्रीवरील 28 टक्के जीएसटी कमी करुन 5 टक्के करावी. तेलंगणा सरकारने विडी विक्रीवरील 28 टक्के जीएसटी रद्द होण्यासाठी विधान सभेत ठराव मंजुर करुन केंद्र सरकारला पाठविले असून, याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाकडे शिफारस करावी. तसेच विडीला लागणारे तेंदूपत्त व तंबाखू वरील जीएसटी कर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.