केडगाव दुहेरी हत्याकांड; पोलिस तपासावर शंका, कुटुंबीय आजपासून बसणार उपोषणाला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  केडगाव दुहेरी हत्याकांडातील काही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने पोलिसांच्या तपासावरच मृतांच्या कुटुंबीयांनी शंका उपस्थित केल्या आहेत. योग्य पद्धतीने तपासी अधिकाऱ्यांकडून तपास होत नसल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे. योग्य तपास होण्यासाठी मृतांचे नातेवाइक हे त्यांच्या घरीच शनिवारपासून उपोषण सुरू करणार आहेत.

केडगाव येथे पोटनिवडणुकीच्या वादातून संजय कोतकर, वसंत ठुबे यांची मागील महिन्यात हत्या झाली. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर काही आरोपी फरारी आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पोलिस तपास पथकही नियुक्त केलेले आहे. या गुन्ह्यांतील इतर आरोपींना अटक होत नसल्याने मृतांचे नातेवाइक संग्राम कोतकर, प्रमोद ठुबे, सुनीता कोतकर, अनिता ठुबे यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांना या गुन्ह्याच्या तपासाबाबत निवेदन दिले आहे.

हत्याकांडप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, भानुदास कोतकर यांच्याविरुद्ध गुन्हा असताना केवळ संग्राम जगताप यांनाच अटक करण्यात आलेली आहे. कर्डिले हे भाजपचे आमदार असल्याने त्यांना राजकीय पक्षातील संबंधातील नेतेमंडळींचा पाठिंबा असल्याने त्यांना पोलिस प्रशासनाने हत्येचा गुन्ह्यात अटक केली नाही, असा आरोप दोन्ही कुटुंबीयांनी केलेला आहे.

आरोपी अरुण जगताप हे आर्थिक व राजकीय दृष्टीने बलदंड आहेत. हत्याकांडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी जगताप यांना गुन्ह्यात गोवले असल्याचे जाहीर केले आहे. राजकीय दबाव आणल्याने आरोपींवर पोलिसांनी कारवाई केलेली नाही, भानुदास कोतकर हे शिरुर, पुणे, मुंबई या ठिकाणी राहतात. एका गुन्ह्यात ते दर सोमवारी येथील पोलिस स्टेशनला हजेरी लावतात. त्यानंतर तपास अधिकारी त्यांना अटक करीत नाहीत. त्यावरून तपास यंत्रणा आरोपींना मदत करत असल्याचे दिसून येत आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.