चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मामा आणि भाचा विरोधात गुन्हा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्‍तीच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला पाठलाग करून पकडण्यात आले. मात्र, त्याच्या मामाने ऐनवेळी येऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वीच भाच्याला पळून जाण्यास मदत केली. यामुळे राहुरी पोलीस ठाण्यात मामा आणि भाचा या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, दि. 9 रोजी सकाळी राहुरी शहरातील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांच्या गोकूळ कॉलनी येथील घरात मद्यधुंद अवस्थेत असलेला एक भामटा चोरीच्या उद्देशाने घुसला व पहिल्या मजल्यावरून चाव्यांचा जुडगा घेऊन दुसऱ्या मजल्यावर गेला. त्याने उचकापाचक सुरू केली. पारख कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी त्या भामट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो घरातून पळून गेला. या वेळी प्रकाश पारख व आणखी काही लोकांनी त्याचा पाठलाग केला असता तो भामटा तहसील कार्यालयाच्या आवारातील सेतू कार्यालयाजवळ लपून बसला.

प्रकाश पारख यांनी भामट्याला पकडले. तो राहुरी शहरातील आहे. त्याचे नाव शशिकांत गुंजाळ असल्याचे समजले. पारख यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देत असताना सेतू कार्यालयातील त्याचा मामा अनिल शिंदे याने पारख यांना दमदाटी करून धक्काबुक्की केली. या वेळी शशिकांत गुंजाळ याने स्वत:चे डोके फोडून घेत नौटंकी केली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. याबाबत प्रकाश पारख यांनी शशिकांत भीमराज गुंजाळ व अनिल शिंदे या मामा-भाच्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.