नगरसेवक गाडे, जाधव यांच्यासह १७ जणांना न्यायालयीन कोठडी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव येथे शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर घडलेल्या दगडफेक़प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे, सचिन जाधव यांच्यासह १७ जणांना गुरुवारी (दि. १०) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांचेसमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 


यावेळी पोलिस प्रशासनातर्फे पो. नि. रमेश रत्नपारखी, सरकार पक्षातर्फे ॲड. सीमा देशपांडे तर आरोपींच्यावतीने ॲड. शशिकांत रकटे, ॲड. राहुल पवार यांनी बाजू मांडली. केडगाव येथे शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर संतप्त जमावाने परिसरात दगडफेक करुन वाहनांचे नुकसान केले. रास्ता रोको केला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी (दि. ७) नगरसेवक योगीराज गाडे, रावजी नांगरे, प्रफुल्ल साळुके, गिरीष राजेंद्र शर्मा, सुनील गोपाळ वर्मा, अमोल येवले, अभिजीत शशिकांत राऊत, दत्तात्रय तुकाराम नागापुरे, आणि राजेश वैजीनाथ सातपुते यांना अटक केली. त्यांना सुरुवातीला न्यायालयाने दोन दिवस व त्यानंतर एक दिवस पोलिस कोठडी दिली. गुरुवारी (दि. १०) त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 

तसेच बुधवारी (दि. ९) सेनेचे नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती सचिन जाधव, विठ्ठल सातपुते , राजेंद्र मोहनराव पठारे, रावसाहेब नारायण भाकरे, दिपक सर्जेराव कावरे, सचिन गणेश राऊत, अशोक शामराव दहिफळे, सुशांत गिरीधर म्हस्के यांना अटक करण्यात आली होती. 

त्यांना गुरुवारी (दि.१०) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी पो. नि. रत्नपारखी यांनी आरोपीकडून इतर आरोपींची नावे निष्पन्न करावयाची आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्याच्यावेळी कोणत्या वाहनावरुन आले ती वाहने जप्त करावयाची आहेत. तसेच त्यांना कोणी प्रवृत्त केले याचा तपास करायचा आहे तेव्हा पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. 

सरकार पक्षातर्फे युक्तीवाद करताना ॲड. सीमा देशपांडे यांनी प्रबळ दाखले दिले तर आरोपींच्यावतीने ॲड. राहुल पवार ॲड. शशिकांत रकटे यांनी युक्तीवाद करताना आरोपींची नावे, पत्ते फिर्यादीमध्येच नमूद आहेत. तपासात कोणतीही प्रगती नाही तेव्हा आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून १७ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.