जिल्हा विकासासाठी सामाजिक सलोखा आणि सामंजस्य आवश्यक- पालकमंत्री प्रा. शिंदे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन जिल्हा विकासाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न आपण करत असून या विकास कामांमध्ये सर्वांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक सलोखा व शांततामय वातावरण महत्वाचे आहे. हा सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी दाखविलेली सामंजस्याची आणि सौहार्दाची भूमिका आगामी काळातही कायम राहील, असा विश्वास राज्‍याचे जलसंधारण व राजशिष्‍टाचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याण मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.


महाराष्ट्र दिनाच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर केलेल्या भाषणात ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, महापालिका आयुक्त घन:शाम मंगळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शानदार संचलन झाले. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली. त्यानंतर विविध पुरस्कारांचे वितरण प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाले.

पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, जिल्हा प्रशासनाचे नियोजन, लोकप्रतिनिधींचा पुढाकार, प्रसारमाध्यमांची सकारात्मक साथ आणि वाढत्या लोकसहभागामुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात चांगले काम झाले. यावर्षी श्रमदानाच्या माध्यमातून अनेक गावे पाणीदार होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. टंचाईमुक्त महाराष्ट्र-2019 नुसार जिल्हा टंचाईमुक्त होण्यासाठी आपण सर्व मिळून एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केले.

सध्या जिल्ह्याच्या काही भागात पाणीटंचाई जाणवत असली तरी जलसंधारणाच्या विविध कामांमुळे ही गावेही पाणीदार होतील. जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला असून आवश्यक त्या ठिकाणी टंचाई उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 47 हजार 456 शेतकऱ्यांना आपण कर्जमाफीचा लाभ दिला. अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासत त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचे काम आपण विविध योजनांच्या माध्यमातून करत आहोत, असे ते म्हणाले.

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, कीटकनाशके आणि खते यांचा तुटवडा जाणवणार नाही, याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या हंगामात 3 हजार 47 कोटी रुपयांच्या कृषी पत पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बॅंकांनी कर्ज उपलब्ध करुन द्यावे, याच्या सूचना बॅंकांना दिल्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी सांगितले.

सामान्य नागरिकांशी निगडीत असणाऱ्या कृषी योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने चांगले काम केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, गळीत धान्य विकास कार्यक्रम, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि जमीन आरोग्य पत्रिका अशा कृषी विस्तार योजनांच्या अंमलबजावणीत आपला जिल्हा आघाडीवर आहे. याशिवाय, उन्नत शेती व समृद्ध शेतकरी योजनेत गेल्या 3 वर्षाच्या कालावधीत 22 कोटी 47 लाख रुपयांची ट्रॅक्टर, पॉवरटिलर, पेरणीयंत्र, मळणीयंत्र, कल्टीवेटर, रोटावेटर अशी यंत्र आणि अवजारे अनुदानावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली. मागेल त्याला शेततळे ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 7 हजार 610 शेततळी पूर्ण करण्यात आली असून राज्यात आपण प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात 2 हजार 340 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील 310 अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांना लाभ मिळवून दिल्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी नमूद केले.

जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आजपासून सुरुवातीच्या टप्प्यात प्रातिनिधीक स्वरुपात काही गावातील नागरिकांना संगणकीकृत व प्रमाणित सातबारे उपलब्ध होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने याकामी अधिक सकारात्मक पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जागतिक बॅंक प्रकल्पाच्या माध्यमातून सध्या जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गांचे काम सुरु आहे. अहमदनगर बाह्यवळण रस्त्यासह विविध महामार्गांच्या कामांचा यात समावेश आहे. याशिवाय, स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून गावविकासाची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या कामांमुळे जिल्हा विकासाचा वेग निश्चितपणे वाढणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

वृक्षलागवड मोहिमेतील आपल्या जिल्ह्याला असलेले 49 लाख 94 हजारांचे उद्दिष्ट सर्वांच्या सहभागाने आपण निश्चितपणे पूर्ण करु, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, वामनराव कदम, ज्योती कावरे, तहसीलदार गणेश मरकड, सुधीर पाटील, आप्पासाहेब शिंदे आदींसह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी परेड कमांडर सहायक पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने शानदान संचलन केले.पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार जेऊर (ता. नगर) येथील तलाठी एम.एम. पठाण यांना देण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड पांडुरंग गणपत शिंदे (रा. गळनिंब, ता. श्रीरामपूर) यांनाही यावेळी सन्मानपत्र देऊन सन्मानित कऱण्यात आले. जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सुनील पवार, प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान माशाळकर आणि प्रमोद भिंगारे, महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना चव्हाण, महिला पोलीस नाईक मनीषा निमोणकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल कोमल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सहायक फौजदार दिलीप सोनुले, आल्ताफ शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंबादास शिंदे, राजेंद्र गोडगे, काकासाहेब जगदाळे, यांना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरवण्यात आले.

जिल्हा लघुद्योग पुरस्काराचेही वितरण यावेळी झाले. मे. कल्पलक्ष्मी एग्रो प्रोसेसिंग एन्ड ट्रेडर्स (भांडेवाडी, ता.कर्जत), मे. साई एक्युमलेटर्स (संगमनेर), मे. डी.एस.के. ग्लोव्हज (अहमदनगर) आणि मे. सुरवि डिजीटल कलर लॅब (अहमदनगर) यांना लघुद्योग क्षेत्रात जिल्हापातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.