शेतात झाडे लावा, संगोपन करा, पैसेही मिळवा.....

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :रोजगार हमी योजनेंतर्गत सामाजिक वनीकरण विभागामार्फत शेतांच्या बांधावर वृक्षलागवड केली जाणार आहे. रोपांची देखभाल, संगोपन केल्याबद्दल शेतकऱ्यांना आर्थिक मोबदलाही दिला जाणार आहे. पर्यावरणाचे संवर्धन साधतांना ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने योजना अंमलात आणली आहे. या योजनेसाठी १२ एप्रिलला शासन निर्णय जारी झाला.सामाजिक वनीकरण विभागामार्फत ही योजना राबवली जाईल. वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर किंवा शेतजमिनीवर वृक्ष लागवड होईल. ही योजना वैयक्तिक लाभाची आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, स्त्री कर्ता असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी, तसेच लहान व सीमांतभूधारक शेतकरी यांच्या जमिनीवरील कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्णयात स्पष्ट केले आहे.

मग्रारोहयोसाठी जॉबकार्ड धारक वरील नमूद प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पत्र आहे. इच्छुक लाभार्थ्यांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या शिफारशीसह सामाजिक वनीकरण शाखेकडे अर्ज करता येईल.

शेतकऱ्यांचा गट ही प्रकल्पात सहभागी होऊ शकेल. लाभार्थ्यांच्या यादीस जिल्हाधिकारी यांच्‍या अध्यक्षते खालील समिती मंजुरी देईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील तालुकास्तरीय वनपरिक्षेत्र अधिकारी (सामाजिक वनीकरण), यांचेशी संपर्क साधावा असे सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कीर्ति जमदाडे यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.