शेतकरी आत्महत्यांप्रकरणी सरकार व प्रशासनाविरूद्ध ३०२ दाखल करण्याची मागणी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जमाफी व बोंडअळीची मदत न मिळाल्यामुळे स्वतःची चिता रचून आयुष्य संपवणारे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी माधवराव रावते यांच्या आत्महत्येचे पुरावे दडवून तो एक अपघात सिद्ध करण्याचा खटाटोप भाजप-शिवसेनेचे सरकार करते आहे. खून करून पुरावे दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंद्राणी मुखर्जी, अभय कुरूंदकर, युवराज कामटे आणि आत्महत्येचे पुरावे दडपणाऱ्या या सरकारमध्ये काहीही फरक नाही. मुखर्जी, कुरूंदकर, कामटे आणि हे सरकार एकाच माळेचे मणी आहेत, असा घणाघाती हल्लाबोल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

विखे पाटील यांनी आत्महत्या करणारे यवतमाळ जिल्ह्यातील सावळेश्वरचे शेतकरी माधवराव रावते, राजूरवाडीचे शंकर चायरे आणि टिटवीचे प्रकाश मानगावकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत त्यांनी या आत्महत्यांच्या घटना आणि सरकारकडून त्यांच्यावर होत असलेल्या दडपशाहीची माहिती घेतली. त्यानंतर यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर आसूडच ओढला.

ते म्हणाले की, या सरकारने सावळेश्वर येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. शासनाच्या निष्क्रियतेमुळे ही आत्महत्या असल्याची कबुली दिली जात नाही. उलटपक्षी आत्महत्येचे पुरावे दडपण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कर्जमाफी व बोंडअळीची मदत न मिळाल्याने झालेल्या शेतकरी आत्महत्या एकप्रकारे सरकारने केलेल्या हत्याच आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात असे असंवेदनशील आणि कोडगे सरकार कधीही झाले नव्हते. या सरकारला शेतकऱ्यांच्या जीवाची अजिबात किंमत राहिलेली नाही, हेच या शेतकरी आत्महत्यांमधून स्पष्ट झाले आहे.

माधवराव रावतेंच्या आत्महत्या प्रकरणी सकृतदर्शनी दिसणारी वस्तुस्थिती आणि तलाठी-तहसिलदारांचा अहवाल नाकारून सरकार हा अपघातच असल्याचे सांगते आहे. त्यासाठी या आत्महत्येचे पुरावेही दडपले जात आहेत. खून पाडून पुरावे दडपण्यासाठी जी कारवाई अभय कुरुंदकर, युवराज कामटे, इंद्राणी मुखर्जीवर झाली, ती कारवाई रावते आत्महत्या प्रकरणात करावी. सरकार व उमरखेडच्या विभागीय अधिकाऱ्याविरूद्ध ३०२ आणि पुरावे दडपण्याचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.