सुट्ट्यांमुळे भाविकांच्या गर्दीने फुलली साईनगरी,लाखो भाविक साईचरणी नतमस्तक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सलग चार दिवस जोडून सुट्टया आल्याने शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे साईनगरी फुलुन गेली आहे. कडक उन्हाळा जाणवत असला तरी श्रध्देपोटी भाविक उन्हाची पर्वा न करता साईचरणी नतमस्तक होत आहेत.
शनिवार, रविवार, बौध्द पौर्णिमा, महाराष्ट्र दिन अशा चार दिवस सलग सरकारी सुट्ट्या आल्याने व शालेय परिक्षा संपल्याने दुग्धशर्करा योगाची ही पर्वणी साधण्यासाठी अनेक भाविक शिर्डीत दाखल झाले. साईनगरीत भाविकांची शुक्रवार पासुनच गर्दी वाढण्यास सुरुवात झाली होती. शनिवारी सायंकाळपासून गर्दीत वाढ झाली. रविवारी मात्र यात चांगली भर पडली. भर उन्हाळ्यातही लाखो भाविकांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. 

बायोमेट्रीक पास मिळविण्यासाठी भाविकांना मोठी कसरत करावी लागली अनवाणी इकडुन तिकडे फिरण्याची वेळ आली. तसेच दर्शन रांगेत तासन्तास दर्शनासाठी प्रतिक्षा करावी लागल्याने साईसंस्थानच्या नियोजनावर भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बायोमेट्रीक पासचा त्रास कशासाठी असा सवाल अनेक भक्तांनी व्यक्त केला. जर या पासच्या टायमींगनुसार विना दर्शनरांग शिवाय दर्शन देणार असेल तर बायोमेट्रीक पास द्या अन्यथा ते बंद करण्याची मागणी भाविकांनी केली. 

बायोमेट्रीक पास घेण्यासाठी रांग व पुन्हा दर्शन घेण्यासाठी रांग सर्वच ठिकाणी रांगा लावाव्या लागत असल्याने मोठा वेळ जात असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी दिली. साईमंदिर परिसर तसेच दर्शन रांगेत भक्तांनी ऊन लागु नये यासाठी साईबाबा संस्थानने मंडप उभारल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला.

साईमंदिर परिसरात भाविकांची फसवणुक होऊ नये, पाकीटमारीस आळा बसावा यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. पाकीटमारांवर करडी नजर ठेवल्याने यास आळा घालण्यात यश मिळाले असल्याचे सुरक्षा विभागाचे पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे यांनी सांगितले. शनिवारी व रविवारी सायंकाळपयंर्त साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात १ लाख भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तर रविवारी दिवसभरात एक लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. 

भाविकांची तृष्णा भागविण्यासाठी साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर परिसरात आर.ओ.च्या पाण्याची विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जड वाहतुक बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात आल्याने शिर्डीत वाहतुकीचा खोळंबा जाणवला नसला तरी छोटी वाहने, प्रवाशी वाहने यांचा अडथळा आल्याने क्षणाक्षणात वाहतुक ठप्प होताना दिसत होती. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.