दुग्धविकास मंत्री जानकर यांच्या प्रतिमेला भेसळयुक्त दूध व मलईचा अभिषेक होणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सरकारी दूधधोरणा विरोधात शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला असता या आंदोलनात पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आदि स्वयंसेवी संघटना देखील उतरणार आहे. संघटनेच्या वतीने बुधवार दि.2 मे च्या रात्री जिल्हाधिकारी कार्यालया समोर घंटानादने शासनाची झोपमोड करीत, सरकारी अधिकार्‍यांना दूधाचे वाटप केले जाणार आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
भेसळयुक्त दुधाने नागरिकांसह भावी पिढीचे आरोग्य धोक्यात टाकून, दूध उत्पादक शेतकर्‍यांना देशोधडीस लावणार्‍या सत्ताधार्‍यांचा निषेध करण्यासाठी पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची प्रतिमा दगडाला चिटकवून त्याला दुध व मलईचा अभिषेक घातला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

शेतकर्‍यांकडून संकलित केलेल्या एका टँकरच्या दुधावर प्रक्रिया करुन तीन टँकर दूध कृत्रिमरित्या तयार केले जाते. याचा परिणाम दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या दरावर झाला आहे. या दुधामुळे सर्वसामान्य नागरिकांचे व भावी पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. कृत्रिम दूध तयार करणार्‍या संघावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शेतकरी व ग्राहकांची लूट चालू आहे. याला सरकारी धोरण जबाबदार असून, या खात्याचे मंत्री या विषयावर लक्ष द्यायला तयार नाहीत. एक प्रकारे दूध भेसळीला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप अ‍ॅड.गवळी यांनी केला आहे.

दूध संघात अनेक राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने यावर कारवाई होत नाही. दूध उत्पादक शेतकरी तोट्यात तर डेअरी चालक कोट्यावधी रुपये कमवीत आहे. शेतकर्‍यांच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या व भेसळयुक्त विषारी दूधाद्वारे नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालण्यास कारणीभूत ठरत असलेले दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांना भेसळयुक्त दुग्धविकास मंत्री म्हणून घोषित केले जाणार आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांना योग्य हमीभाव मिळण्याची व ग्राहकांना दर्जेदार शुध्द निर्भेसळ दूध पुरविण्याची मागणी आंदोलनकर्ते करणार आहे. 

या जन आंदोलनात सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. कॉ.बाबा आरगडे यांच्या हस्ते शेतकरी संरक्षण कायद्याचे प्रस्ताव पूजन करुन या आंदोलनाचे प्रारंभ केले जाणार आहे. या आंदोलनासाठी अ‍ॅड.गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, यमनाजी म्हस्के, संतोष शिंदे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, हिराबाई ग्यानप्पा, रंजना गायकवाड, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम आदिंसह विविध स्वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी प्रयत्नशील आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.