अण्णांच्या तालुक्यात झाडे लावण्याच्या चार्‍या खोदाईत वनरक्षकाकडून भ्रष्टाचार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर वनकुटे परिसरात झाडे लावण्यासाठी सुरु असलेल्या चार्‍या खोदाईच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करीत, चर्मकार विकास संघाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन देण्यात आले. 


तसेच या कामातील भ्रष्टाचार दडपण्यासाठी स्थानिक कामगारांना डावलून जिल्ह्याबाहेरील ठेकेदार व कामगारांना काम देण्यात आल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, ग्रा.पं. सदस्य दिपक खामकर, तालुकाध्यक्ष संतोष लोहकरे आदि उपस्थित होते.

या कामाची चौकशी करणार्‍या ग्रामपंचायत सदस्य दिपक खामकर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन दमबाजी केली असता वनरक्षक किसन रंगनाथ आगलावे यांच्यावर पारनेर पोलिस स्टेशनला नुकताच भादवि 507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाकळी ढोकेश्‍वर येथील वनकुटे परिसरात वन विभागाच्या वतीने झाडे लावण्यासाठी चार्‍या खोदाईचे काम सुरु असताना ग्रा.पं. सदस्य दिपक खामकर व पदाधिकारी चुकीच्या पध्दतीने काम चालू असल्याची माहिती मिळाल्याने दि.22 एप्रिल रोजी सदर कामाच्या पहाणीसाठी गेले होते. 

ठेकेदार व मुकादमकडे या संदर्भात चौकशी केली असता स्थानिक कामगारांना डावलून सोलापूर जिल्ह्यातील ठेकेदार व कामगारांना काम देण्यात आल्याचे निदर्शनास आले. खामकर यांनी या कामाच्या विचारपुससाठी वनरक्षक किसन आगलावे यांना संपर्क केला असता त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत खामकर यांना दमबाजी केली होती.

खामकर यांनी पारनेर तालुका नेहमीच दुष्काळग्रस्त असल्यामुळे स्थानिक मजुर, कामगारांना वन विभागाचे काम मिळावे ही रास्त भुमिका मांडली. मात्र या कामात भ्रष्टाचार करता यावा या हेतूने आगलावे यांनी जिल्ह्याबाहेरील मजुर व ठेकेदारांना हे काम दिले. तसेच सदरील काम निकृष्ट दर्जाचे होत असून, यामध्ये मोठा भ्रष्टाचार चालू असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. 

या कामाची चौकशी होण्यासाठी चर्मकार विकास संघाचे शिष्टमंडळ वन विभागाच्या मुख्य कार्यालयात अधिकार्‍यांची भेट घेणार असून, सदरील कामाची चौकशी होवून, वनरक्षक आगलावे यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्या इशारा प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.