भानुदास कोतकर फरार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी खुनातील तपासात भानुदास कोतकर व त्याच्या कुटुंबापर्यंत धागेदोरे मिळाले आहेत. तपास पथकाने भानुदास कोतकरचा शोध सुरू केला आहे. पुणे, शिरुर, मुंबई येथील बंगल्यांवर त्याचा पोलिस पथकाने शोध घेतला. या ठिकाणी कोतकर सापडला नाही. कोतकर याचा शोध घेण्यात येत असल्याचे तपासी अधिकारी दिलीप पवार यांनी न्यायालयात सांगितले.

खुनातील आरोपी नगरसेवक विशाल कोतकर व रवींद्र खोलम यांची न्यायालयासमोर पोलिस कोठडी मागताना तपासी अधिकारी पवार यांनी ही माहिती दिली. केडगावमधील खुनांपूर्वी रवींद्र खोल्लम व मयत संजय कोतकर यांच्या मोबाइलवरून संभाषण होऊन वाद झाला. मृत संजय कोतकर यांनी फोनवरून खोलमला धमकी दिली होती. त्यानंतर खोलमने ही माहिती नगरसेवक विशाल कोतकरला दिली होती.

विशाल कोतकरने ही माहिती नगरसेविका सुवर्णा कोतकर यांना दिली. त्यानंतर सुवर्णा कोतकर यांनी सासरे भानुदास कोतकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. सुवर्णा कोतकर व भानुदास कोतकर या दोघांचे कॉल डिटेल्स पोलिसांना मिळाले आहेत. या दोघांत नेमके काय संभाषण झाले, याचा पोलिसांना शोध घ्यायचा आहे. त्यासाठी भानुदास कोतकरकडे पोलिसांना तपास करायचा आहे. 

लॉटरी विक्रेते अशोक खांडे खूनप्रकरणी भानुदास कोतकर व त्याच्या तीन मुलांना जन्मठेप झालेली आहे. आजारपणामुळे भानुदास कोतकरला जामीन मिळालेला आहे. त्याला नगर जिल्हाबंदी आहे. जामीन घेताना कोतकरने रहिवासाचे पत्ते दिलेले आहेत. कोतकर याचे पुणे, मुंबई, शिरुर येथे बंगले आहेत. या तीन ठिकाणी कोतकर याचा पोलिस पथकाने शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. खुनच्या गुन्ह्याच्या फिर्यादीत भानुदास कोतकरचे नाव आहे. परंतु, तो आता फरारी झालेला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.