रस्त्याच्या दुर्दशेमुळे साईभक्तांचे हाल !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ते शिर्डी या डांगेवाडीमार्गे असलेल्या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. रस्ता दुर्दशेमुळे साईबाबांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या साईभक्तांचे प्रचंड हाल होत आहेत. हा रस्ता शिर्डी विमानतळालाही जोडला जातो.साईसंस्थानने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी बिरोबा कला,क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संपतराव दिघे यांनी केली आहे.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथून शिर्डी व काकडी विमानतळाकडे जाणारा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तळेगाव ते काकडी हा रस्ता पुढे शिर्डीकडे जातो. या रस्त्याने साईभक्तांची वर्दळ असते. शिर्डी (काकडी) विमानतळाकडे जाणारा हा रस्ता शिर्डीकडे पायी जाणाऱ्या साईभक्तांसाठी कमी अंतराचा आहे. 

या रस्त्याचा काही भाग संगमनेर हद्दीत तर काही कोपरगाव हद्दीत येतो. संगमनेर हद्दीत एक किलोमीटरपयंर्त रस्ता डांबरीकरण करण्यात आले होते. तेही उखडले. उर्वरित खडीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात खडी उखडली आहे. सदर रस्ता दुर्लक्षित आहे. मात्र काकडी विमानतळामुळे हा रस्ता जगाच्या नकाशावर आला आहे. 

साईबाबांच्या कृपेने साईसंस्थानच्या झोळीत करोडो रुपयांचे दान जमा होत असताना परिसरातील वीस किलोमीटर अंतराच्या आतील रस्ते दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग देखील या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे लक्ष देताना दिसत नाही. तळेगाव ते शिर्डी या दुर्दशाप्राप्त रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी बिरोबा कला - क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संपतराव दिघे यांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.