आमदार मोनिका राजळे यांचे तुफान आलं या...

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ४२ गावांनी भाग घेतला आहे. सध्या तालुका या चळवळीशी एकरूप झाला असून आमदार मोनिका राजळे यांनी मनापासून या कामात झोकून दिले आहे. फोटोपुरते न करता खरोखर श्रमदान करून मोनिका यांनी कार्यकर्त्यांपुढे आदर्श ठेवला आहे. मोनिका यांचे तुफान आलं या... असे म्हणण्याची कार्यकर्त्यांवर वेळ आली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तालुक्यातील चिचोंडी शिराळ, जोगेवाडी, भिलवडे, खेर्डे, पिंपळगाव टप्पा या गावांमध्ये ग्रामस्थांनी एकजूट दाखवून गट-तट बाजूला ठेवत कामाला प्रारंभ केला. आबालवृद्ध स्त्री-पुरुष एकत्र येतात, स्फूर्तिगिते म्हणत, घोषणा देत कामावर जातात. भजने, लोकगीते गात श्रमदान करतात. पाण्याचे महत्त्व पटल्याने सर्वच जण अत्यंत प्रामाणिकपणे श्रमदान करत आहेत. 

यापूर्वी अशा पद्धतीची लोकजागृती झाली नव्हती. पाणीदार शिवाराला आता लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. शिस्तबद्ध नियोजन, कामांमध्ये कमालीचा प्रामाणिकपणा यामुळे कामाचा वेगसुद्धा वाढला आहे. स्वयंसेवी संस्था, महिला मंडळे, भजनी मंडळे, शाळकरी मुलेसुद्धा उत्साहाने सहभागी होत असल्याने पहिल्या टप्प्याततरी श्रमदानाचे तुफान आलं या असे चित्र आहे. 

आमदार राजळे यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधे, सहजपणे मिसळून संवाद साधणारे. पती निधनाच्या धक्क्यातून सावरत त्यांनी वॉटर कपच्या माध्यमातून लोकांमध्ये मिसळून संवाद साधायला प्रारंभ केला. सायंकाळच्या वेळी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थकांसह गावात आमदारांचा ताफा पोहोचला की, वाजत-गाजत मिरवणूक निघून सभास्थळी फटाक्यांची आतषबाजी होते. 

राजकीय विचारांचे जोडे बाजूला ठेवून सुरू झालेला संवाद विकासाच्या मुद्द्यावरून उपस्थितांच्या मनामध्ये पाझरू लागतो. ग्रामस्थांना प्रोत्साहित करणारे भाषण करत आमदार राजळे श्रमदानाच्या स्थळावर जातात. त्यांच्यामागे सर्व ग्रामस्थ घोषणा देत कामाच्या ठिकाणी पोहोचले की, गटनिहाय कार्यकर्ते घमेले, खोरे, फावडे घेऊन उभे राहतात. भारतमातेचा जय जयकार होतो अन् सर्व हात श्रमदान करू लागतात. 

आमदार राजळे माती भरलेले घमेले घेऊन किंवा उकरलेली माती खोऱ्याने ओढून श्रमदान करतात. अनेकांची त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याची धडपड सुरू होते. काही मिनिटे कार्यकर्त्यांची हौस झाल्यावर गोड भाषेत आमदारांकडून कार्यकर्त्यांना काम करण्याची समज दिली जाते. आपण आमदार आहोत, असा कोणताही पडदा डोळयासमोर न ठेवता घामाघूम होऊन मोनिकाताई काम करत रहातात. 

आपल्या घामाचे चार थेंब या शिवारात पडले की, भावनिक जिव्हाळा वाढतो.देवाच्या कृपेने पाऊस चांगला पडून पाणी पातळी वाढली की, घामाच्या थेंबांचे मोती झाल्याचा आनंद जगण्याला नवी उभारी देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करत राजळेंकडून सर्वांनाच घामाघूम होईपर्यंत काम करायला लावले जाते. नटूनथटून आलेल्या हौशी पदाधिकारी सुध्दा धुळीने माखून जातात. 

श्रमदानातून जरा वेळ काढून अन्य ग्रामस्थांजवळ जात थकले का पाणी प्या, छान काम केले, जपून काम करा, अशा अास्थेवाईकपणे आपुलकीच्या शब्दांनी कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची आमदारांची थाप पडली की उत्स्फूर्तपणे दोन मिनिटे घोषणाबाजी होते. दोन तासांच्या श्रमदानानंतर श्रमपरिहार सुरू होतो. आमदार राजळे शिस्तीचे नियम पाळत जमिनीवर रांगेत बसत झुणका-भाकर किंवा कढी लापशी असा महाप्रसाद सर्वांबरोबर घेतात. 

उत्साही महिलांकडून आमदारांपुढे रांगोळी काढली जाते. तेथे एखाद्या ज्येष्ठ स्त्री किंवा पुरुषाला बसवून त्या कार्यकर्त्यात रमतात. पंगत वाढणे, जेवणावर लक्ष ठेवणे, अशा कामांमध्ये सुध्दा अस्सल गृहिणीप्रमाणे काम करताना पाहून कार्यकर्त्यांची पुरती दमछाक होते. वॉटर कप स्पर्धाऐवजी राजळेंचे आलेले तुफान यानिमित्ताने राजकीय वर्तुळात चर्चेचे ठरले असून आगामी काळात हे तुफान आणखी गती येईल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.