नगरच्या गुंतवणूकदारांना २३ कोटींना गंडा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहर उपनगर व तालुक्यातील गुंतवणुकदारांना जादा व्याजाचे अमिष दाखवून, त्यांच्याकडून पैशाची गुंतवणूक करुन घेवून मुदतीनंतर पैसे माघारी देण्यास नकार दिला. २८ हजार गुंतवणुकदारांची २३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन मैत्रेय ग्रुपच्या चेअरमनसह चौघांविरुध्द तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना दि. ५ फेब्रुवारी २०/६ ते दि. १९ एप्रिल २०१८ या दरम्यान मंगलगेट येथील आशिर्वाद बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावरील पाचव्या व सहाव्या सदनिकामध्ये घडली. याप्रकाराने गुंतवणुकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी की, नगरमधील मंगलगेट पोलिस चौकीसमोरील आशिर्वाद बिल्डींगमध्ये दुसऱ्या मजल्यावर मैत्रेय ग्रुपचे कार्यालय सुरु करण्यात आले होते. या कंपनीने सतीश पुंडलिक पाटील (रा.रुई, ता. राहाता) याची एजंट म्हणून नेमणूक केली होती. एजंट पाटील यांच्याकडून नगर शहर, उपनगर आणि तालुक्यातील नागरीकांना अधिक व्याजासह विविध योजनांचे अमिष दाखवून कंपनीत गुंतवणूक करण्याचे आवाहन करुन पैसे गुंतविण्यास सांगितले. 

त्यानूसार पाटील यांच्यामार्फत २८ हजार नागरीकांनी मैत्रेय ग्रुप कंपनीत पैशाची गुंतवणुक आर.डी. व एफ.डी. स्वरुपात चांगल्या व्याजाच्या अपेक्षेने केली. गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीची मुदत संपल्याने गुंतवणुकदारांनी त्यांच्या पैशाची मागणी केली असता मैत्रेय ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रथम पैसे देण्यास टाळाटाळ केली नंतर काही गुंतवणूकदारांला न वटणारे चेक दिले तर काहींना पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. 

अशा रितीने २८ हजार गुंतवणुकदारांची एकूण २३ कोटी रुपयांची फसवणुक केली. याप्रकरणी सतीश पाटील यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात मैत्रेय ग्रुपच्या चेअरमन वर्षा सत्पाळकर, संचालक विजय तावरे, लक्ष्मीकांत नार्वेकर, जनार्धन परुळेकर (सर्व रा. वसई, ठाणे) यांच्या विरुध्द भादवि ४२०/४०६/१२० (ब) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भुसारे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.