पारनेर तालुक्यात शिवसेना पक्षाअंतर्गत संघर्ष वाढण्याची चिन्हे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांची तालुकाप्रमुख पदानंतर आता शिवसेनेतूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून नीलेश लंके यांच्या हाकालपट्टीची माहिती देण्यात आली. लंके समर्थकांकडून मात्र पुढील आमदार नीलेश लंकेच होणार, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. त्यामुळे आगामी काळात आमदार विजय औटी व नीलेश लंके समर्थकांमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पारनेरचे आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी नीलेश लंके यांना बेदखल करण्यात आले होते. कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना नीलेश लंके यांची घोषणाबाजीत झालेली एन्ट्री व्यासपीठावरील अनेकांना खटकली. त्यानंतर झालेला दगडफेकीच्या प्रकारामुळे राज्यभरात याची चर्चा झाली.

त्यानंतर 'मातोश्री'वरून नीलेश लंके यांची तालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टीची घोषणा करण्यात आली होती. नीलेश लंके समर्थकांनीही त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत ताकद दाखवून दिली. तेव्हापासूनच त्यांचे पंख छाटण्यास सुरुवात झाली. मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हंगा ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी केल्याची चर्चा आहे. 

शिवसेनेच्या 'सामना' या मुखपत्रातून पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी नीलेश लंके यांची पक्षातून हकालपट्टीची घोषणा केली. वास्तविक लंके यांच्यासारख्या शिवसैनिकाच्या हकालपट्टीबाबत तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख, जिल्हा उपप्रमुख किंवा संपर्कप्रमुखही कारवाई करू शकतो. परंतु, लंके यांची हकालपट्टी करण्याची घोषणा थेट पक्षाचे सचिव राऊत यांनी केली. 'मातोश्री'वरून याबाबतची घोषणा झाल्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य वाढले आहे.

दरम्यान नीलेश लंके यांची हकालपट्टीची घोषणा झाल्यानंतर पारनेर विधानसभा मतदारसंघातील लंके समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. आमदार औटी समर्थकांकडून 'मातोश्री'च्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले तर लंके समर्थकांकडून आगामी काळात आक्रमक राहण्याचे संकेत दिले आहेत. पारनेर तालुक्यात नीलेश लंके यांचे संघटन सुरूच आहे. त्यामुळे तालुक्यात शिवसेना पक्षाअंतर्गत संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.