अहमदनगर जिल्हा बनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आरुढ होताना नगर जिल्ह्यात त्यांनाच सर्वाधिक 5 जागा मिळाल्या. जिल्ह्यातील दोन्ही कॉंग्रेसची मक्तेदारी मोडून काढल्याचा आनंद त्यावेळी भाजपमध्ये व्यक्त झाला. मात्र पुढे नगर जिल्हाच राज्य सरकारची पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी बनला आहे. मागील साडेतीन वर्षाच्या कारकिर्दीत राज्य सरकारला धक्का देणार्‍या पाच मोठ्या घटना घडल्या. त्यातील चार घटना एकट्या नगरमधील आहेत. हीच राज्य सरकारची आता डोकेदुखी मानली जाते.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राज्यातील मराठा क्रांती मोर्चांना कारणीभूत ठरलेला कोपर्डी येथील बलात्काराचा गुन्हा, मराठा मोर्चांना आव्हान देणारा बहुजन मोर्चा, राज्यात प्रथमच झालेला शेतकरी संप, छिंदम प्रकरण आणि आता केडगाव येथील दुहेरी हत्याकांड, त्याला जोडूनच पोलिस अधीक्षक कार्यालय हल्ला अशा घटनांनी जिल्ह्यातील पडसाद राज्यपातळीवर व राज्य सरकारवर उमटले आहेत.

भौगोलिक दृष्टया सर्वाधिक मोठा असलेला नगर जिल्हा राजकीयदृष्टया देखील ’वजनदार’ आहे. 2 खासदार व 12 आमदार देणार्‍या नगर जिल्ह्याकडे राज्य सरकारचे नेहमी लक्ष असते. मात्र, गेल्या दोन- तीन वर्षापासून बदलत्या घडामोडीत नगरची रूपरेषाच बदलायला लागली आहे. अशांततेचे नगर म्हणून सध्या नगरचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे नगरवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे.

दोन वर्षापूर्वी कोपर्डी बलात्कार व खून प्रकरण घडले. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या दुर्दैवी घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. या घटनेनंतर कोपर्डीसह मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे राज्यभर मोर्चे निघाले. नगरमध्ये हा मोर्चा निघाल्यानंतर ऍट्रॉसिटीच्या कडक अंमलबजावणीसाठी बहुजन समाजाच्या प्रतिमोर्चांना नगरमधून सुरूवात झाली.

मोर्चा- प्रतिमोर्चामुळे त्यावेळी काही काळ नगरचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले होते. त्यानंतर, शेतकरी प्रश्‍नांसाठी इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संपावर जाण्याची वेळ आली. या संपाचीही मुहूर्तमेढ पुणतांबा (ता. राहाता) येथे रोवली गेली. पुणतांब्याच्या शेतकर्‍यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. पुणतांब्याचा शेतकरी संप राज्यभर पोहोचला. या संपात राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

संपकरी शेतकर्‍यांनी दूध, भाजीपाल्यासह शेतीमाल राजधानी मुंबईकडे जाऊ दिला नाही. या संपामुळे राज्य सरकार पूर्णपणे गडबडून गेले होते. सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करत संप व्यवस्थित हाताळला. दरम्यान, दोन महिन्यापूर्वी घडलेल्या छिंदम प्रकरणामुळे नगरचे वातावरण तणावपूर्ण बनले होते. छिंदम प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. त्यात भाजपसह राज्यसरकारलाही नामुष्कीचा सामना करावा लागला.

आठ दिवसांपूर्वी घडलेल्या केडगाव येथील दुहेरी हत्याकांडमुळे नगर जिल्हा पुन्हा एकदा ढवळून निघाला. दुहेरी हत्याकांडानंतर केडगावात तोडफोडीची घटना घडली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय तोडफोड घटनेने तर नगर जिल्हा राज्यभर चर्चेत आला. नगर जिल्ह्याची बिहार तसेच उत्तरप्रदेशशी तुलना करण्यात येऊ लागली. दुहेरी हत्याकांड प्रकरणी तीन आमदारांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दुहेरी हत्याकांड, केडगाव तोडफोड व पोलिस अधीक्षक कार्यालय तोडफोड या तीन प्रकरणात सुमारे हजारांवर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या तीन घटनात गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये सत्ताधारी भाजप, शिवसेना व विरोधी कॉंग्रेस व राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. केडगाव तोडफोडप्रकरणी माजी आमदारावर देखील गुन्हा दाखल आहे.

हत्याकांडासह तोडफोडप्रकरणामुळे नगरचे वातावरण अशांत बनले आहे. यातही राज्य सरकारची चांगलीच गोची झाली. आरोपींमध्ये त्यांचे आमदार शिवाजी कर्डिले यांचाही समावेश आहे. एकीकडे ही अडचण आणि याच एकूण प्रकरणात दुसरीकडे शिवसेना, अशी फडणवीस सरकारची त्रेधा सुरू आहे. केडगाव येथील तोडफोड प्रकरणात शिवसेनेने तर, थेट ‘वर्षा’वरच अटक करुन घेण्याची तयारी सुरु केली होती. तूर्त ते टळले असले तरी हा मुद्दाही राज्य सरकारमध्ये भाजप-शिवसेना अशी तेढ निर्माण करू शकतो.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.