केडगाव हत्याकांड - संदीप गिऱ्हे व महावीर मोकळेस अटक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव येथील दुहेरी हत्याकांडांतील मुख्य आरोपी संदीप गुंजाळचे अन्य दोन साथीदार संदीप गिऱ्हे व महाविर उर्फ पप्पू मोकळे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी शुक्रवारी (दि.१३) रात्री शिरूर (पुणे) व केडगाव येथून ताब्यात घेतले आहे. अन्य एका जणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना झाली असून उर्वरित आरोपीचाही कसून शोध घेतला जात असल्याची माहिती तपासी अधिकारी पो.नि. दिलीप पवार यांनी दिली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या विशाल कोतकर व त्याच्या नातेवाईकांच्या सांगण्यानुसार चौघांनी केल्याची कबुली संदीप गुंजाळ याने पोलिस तपासात दिली असल्याची माहिती पुढे आली आहे. संदीप गुंजाळसह संदीप बाळासाहेब गिऱ्हे, महावीर उर्फ पप्पू रमेश मोकळे (दोघे. रा. शाहुनगर, केडगाव) व अन्य एक अशा चौघांनी केडगावातील दुहेरी हत्याकांड केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

हत्या करणाऱ्या इतर तिघांची नावे पुढे आल्याने त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके प्रभावीपणे गुरूवारपासून कार्यरत झाली होती. शुक्रवारी (दि.१३) दोन पोलिस पथके वेगवेगळया ठिकाणी पाठवण्यात आली होती. पो.नि. दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनूसार या दोन पथकांनी संदीप गिऱ्हे यास पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून तर महावीर मोकळे यास केडगाव येथून शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले.

पोलिसांकडे शरणागती पत्करणारा मुख्य आरोपी संदीप गुंजाळ हा सुरूवातीला हत्याकांड एकटयानेच केल्याचे पोलिस तपासात सांगत होता. तसेच विसंगत माहिती देत पोलिसांची दिशाभुल करत होता. त्यामुळे तपासाला योग्य दिशा मिळत नव्हती. 

आरोपी गुंजाळ व एका साक्षीदाराकडे पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामध्ये विशाल कोतकर व त्याचे नातेवाईक यांच्या सांगण्यावरून संदीप गुंजाळसह संदीप गिऱ्हे, पप्पू मोकळे व गिऱ्हे याचा आणखी एक मित्र या चौघांनी हे हत्याकांड घडवून आणल्याचे तपासात पुढे आले आहे. संदीप गुंजाळ याने संजय कोतकर यांच्यावर गोळीबार करत त्यांचा गुप्तीने गळा चिरला तर संदीप गिऱ्हे याने वसंत ठुबे यांना गोळी घातली व संदीप गुंजाळ याने त्यांच्यावर गुप्तीने वार करत गळा चिरला.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
संदीप गुंजाळ याने गुन्ह्याच्यावेळी वापरलेला मोबाईल फोडून फेकून दिला असता तो हस्तगत करण्यात आला आहे. तसेच संदीप गिऱ्हे याच्याजवळील गावठी कट्टा संदीप गुंजाळ याने लपवून ठेवलेला होता. हा गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच संदीप गुंजाळ याने पारनेर पोलिस ठाण्यात हजर होण्यापुर्वी पोलिस ठाण्याबाहेरील कचऱ्यामध्ये गावठी कट्टयातील चार जिवंत काडतुसे फेकून दिलेली होती. 

सदरची चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच संदीप गुंजाळ याने गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा बाबासाहेब केदार (रा. निमगाव वाघा, ता.नगर) याने पुरवला असल्याने त्यास बुधवारी दि.११ रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. केडगाव हत्याकांड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आ. संग्राम जगताप, बाळासाहेब एकनाथ कोतकर, संदीप गुंजाळ व भानुदास कोतकर उर्फ बी. एम. या चौघांच्या पोलिस कोठडीत १६ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान केडगाव पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी (दि.७) लागला. यामध्ये कॉग्रेसचे विशाल कोतकर हे विजयी झाले. शनिवारी दुपारी शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे हे केडगाव परिसरातील एका हॉटेलवर जेवण करताना निवडणुकीचा आढावा घेत होते. रवि खोलम याच्याशी या दोघांची निवडणुकीपूर्वी वादावादी झाली होती. 

त्यावरून कोतकर व ठुबे यांनी खोलम याला फोन केला असता त्यांचा पुन्हा वाद झाला. तेव्हा तुझ्याकडे येतो व बघतो असे म्हणत, दोघेही खोलम याच्या घराकडे निघाले. याबाबत खोलमने विशाल कोतकर यास घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानूसार कोतकरने संदीप गुंजाळ यास खोलम याच्या घराकडे त्याच्या मदतीसाठी पाठविले. मात्र खोलम घरी नसल्याचे गुंजाळ याला समजले. 

तेव्हा संदीप गिऱ्हे, महाविर मोकळे व अन्य एक जण हत्यारांसह तेथे दाखल झाले व आम्हाला विशाल कोतकरने खोलमच्या मदतीला पाठविल्याचे म्हटले. आणि तेवढयात या चौघांना संजय कोतकर व वसंत ठुबे हे दुचाकीवरून येताना दिसले. त्यांच्यामध्ये वादावादी होवून संदीप गुंजाळने संजय कोतकर यांच्यावर गोळ्या झाडल्या तर संदीप गिऱ्हेने वसंत ठुबे यांच्यावर गोळीबार केला. 

कोतकर यांना गोळया मारल्यानंतर संदीप गुंजाळने काही अंतरावर असलेल्या ठुबे यांचा गुप्तीने गळा चिरला. कोतकर यांना गोळया लागूनही त्यांच्यामध्ये प्राण शिल्लक होते व ते फोनवर कुणाशी तरी बोलत असल्याचे गुंजाळ याने पाहिले. तेव्हा गुंजाळने पुन्हा कोतकर यांच्या जवळ येत त्यांचा गुप्तीने गळा चिरला व त्यांना ठार मारले. 

त्यानंतर गुंजाळने इतर तिघांना घटनास्थळाहून निघून जाण्यास सांगितले व तो स्वता पारनेर पोलिसात हजर होत असल्याची माहिती तोफखाना पोलिस ठाण्याचे पोसई संजयकुमार सोने यांना दिली. त्यानंतर सोने यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना ही माहिती दिली व त्यांनतर गुंजाळ यास अटक करण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.