अहमदनगर जिल्हापरिषदेची शीतकपाट खरेदीमध्ये 49 लाखांची फसवणूक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वर्षभरापूर्वी खरेदी करण्यात आलेली शीतकपाटे (कोल्ड कॅबिनेट व्हर्टिकल) सध्या तरी धूळखात पडून आहेत. पशुंच्या रोगप्रतिबंधक लसींच्या साठवणुकीसाठी जिल्हा परिषदेने 48 लाख 82 हजार रुपये खर्च करून 26 शीतकपाटे खरेदी केले होते. 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .

परंतु, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर 18 तास म्हणजे शीतकपाटाचे तापमान 2 ते 8 डीग्री इतके टिकणे आवश्‍यक असताना केवळ चार ते पाच तास ते तापमान टिकत असल्याने ही शीतकपाटे पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी निकामी ठरली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची तब्बल 49 लाखांची फसवणूक झाली असून, याबाबत शासनस्तरावरील कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.

याबाबत गेल्या सहा ते सात महिन्यांपासून निव्वळ चौकशीचा फार्सच चालू आहे. विशेष म्हणजे पुरवठादाराने जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले तरी पशुसंवर्धन विभागाकडून केवळ कागद रंगविण्याचे काम चालू आहे. यातून पुरवठादाराला पाठिशी घालण्यात येत असून याचा जाबदेखील विचारला जात नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी आता हतबल झाले आहेत. 

पशुंना आवश्‍यक असलेल्या रोगप्रतिबंधक लसी विशिष्ट तापमानात साठवण्यासाठी शीतकपाट खरेदी करण्याचा निर्णय झाला. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर या कपाटांचा वापर होतो. जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून गेल्यावर्षी ही खरेदी झाली. 

शासनाच्या दर करारावरील औरंगाबाद येथील गेस्टो फार्मा या कंपनीकडून प्रत्येकी 1 लाख 87 दराने तब्बल 26 शीतकपाटे खरेदी करण्यात आली. त्यापोटी कंपनीला 48 लाख 82 हजार रुपयांचे बिलदेखील देण्यात आले. परंतु, ही शीतकपाटे पशुवैद्यकीय रुग्णालयात पोहोच झाल्यानंतर त्यात गडबड दिसून आली. ही कपाटे निकृष्ट असल्याचे समोर आले आहे.

निविदेमध्ये अटी व शर्ती दिल्या असतानाही त्या धाब्यावर बसवून कंपनीने निकृष्ट कपाटे पुरविली असल्याचे आढळून आले. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर शीतकपाटाचे तापमान 2 ते 8 डीग्री इतके म्हणजे ते 18 तास टिकले पाहिजे, असे नमूद करण्यात आले असतानाही या पुरवठादार कंपनीने पुरविलेली शीतकपाटे केवळ चार ते पाच तास चालत असल्याचे आढळून आले आहे. 

10 ते 15 डीग्री इतका फरक यात जाणवत आहे. यामुळे लसी टिकवण्यासाठी ही शीतकपाटे निकामी ठरली आहेत. या 26 पैकी केवळ एका ठिकाणी शीतकपाट चांगले आहे. बाकी सर्वच शीतकपाटे सध्या तरी धूळखात पडून आहेत. हे समजल्यानंतर जिल्हा परिषदेने सहायक गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करून या सर्व शीतकपाटांची तपासणी केली असता ही बाब निष्पन्न झाली. 

याबाबत पुरवठादाराला माहिती देण्यात आली. त्याने काही कपाटे बदलून दिली, पण ते त्याच प्रकरणातील असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याचे बिल न देण्याचे आदेश देण्यात आले. तरी त्याचे बिल देण्यात आले. जिल्हा परिषदेने औरंगाबाद व पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून या शीतकपाटांची तपासणी करून घेतली. परंतु, त्यांनी या पुरवठादार कंपनीच्या बाजूने अहवाल दिला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या तक्रारीला कोणीच वाली नसल्याचे आढळून आले. 

त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. परंतु, अद्यापही या चौकशीचा अहवाल आलेला नाही. सध्या तरी ही शीतकपाटे कुचकामी असल्याने त्याचा वापर होत नाही.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.