सतत लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा डॉक्टर प्रियकराकडून खून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सतत लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रियसीचा डॉक्टर प्रियकराने भावाच्या मदतीने गळा दाबून कर्नाटक राज्यात खून केला. ओळख पटू नये म्हणून तिच्या जवळील सर्व चिजवस्तू काढून मृतदेह नदीपात्रात फेकला. परंतु, प्रियसीच्या जीन्स पॅन्टच्या इनपॉकेटच्या सापडलेल्या मोबाइल सीमने खूनाचे रहस्य उलगडले.अवघ्या काही तासात धानोरे (ता. राहुरी) येथील पूनम ब्राह्मणेचा मारेकरी डॉक्टर प्रियकर व त्याचा एमबीएचे शिक्षण घेत असलेला भाऊ यांना गजाआड करण्यात कर्नाटक पोलिसांना यश आले. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत कर्नाटक पोलिसांनी दिलेली माहिती अशी : धानोरे येथील पूनम ब्राह्मणे (वय २३) व डॉ. सुनील चव्हाण (वय २५, रा. रामनगर, ता. गंगाखेड, जि. परभणी) हे दोघे संगमनेरला एकाच महाविद्यालयात शिकत होते. पूनमने नुकतेच नर्सिंग पूर्ण केले, तर सुनीलने बीएचएमएसची पदवी घेतली. महाविद्यालयात असतानाच दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. पदवीनंतर सुनील हडपसरमधील एका रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होता. 

याच रुग्णालयात काही दिवस पूनमने परिचारिका म्हणून काम केले. सध्या ती संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात काम करीत होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर पूनमने सुनीलकडे लग्न करण्याचा हट्ट धरला. सुनीलला लग्नापेक्षा करिअर महत्त्वाचे होते. त्यामुळे त्याने लगेच लग्न करण्यास नकार दिला. परंतु, पूनम तात्काळ लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम होती. तिच्या सततच्या तगाद्याला वैतागलेल्या सुनीलने थेट तिला संपविण्याचा लहान भाऊ संजय चव्हाण (वय २०) याच्या मदतीने कट आखला. 

गुरुवारी (दि. १५) सकाळी त्यांनी पूनमला फिरायला जाण्यासाठी पुण्यात बोलविले. नातलगाची इको स्पोर्टस् कार घेऊन हे तिघे गोव्याला जाण्यासाठी निघाले. दिवसभर महाराष्ट्रात फिरल्यावर आपण पहाटे गोव्याला पोहोचू असे त्यांनी पूनमला सांगितले. पूनम कारमध्ये झोपी गेल्यावर डॉ. सुनील व संजयने कार गोव्याला न नेता गोवा-धारवाड महामार्गाने नेली. शुक्रवारी (दि. १६) पहाटे कार आक्रोळी (ता. खानापूर, जि. बेळगाव, कर्नाटक) या गावालगत आली. याठिकाणी दोघांनी गाडी थांबवून गाडीतील शोपिसची उशी सुनीलच्या मांडीवर झोपलेल्या पूनमच्या तोंडावर दाबून तीचा खून केला. 

संजयने त्याला यात मदत केली. पूनम गतप्राण झाल्याचे लक्षात येताच दोघांनी तिच्या अंगावरील सर्व चिजवस्तू तिची ओळख पटू नये म्हणून काढून घेतल्या. आक्रोळी गावाबाहेरील पांढरी नदीच्या पुलावरून तिचा मृतदेह नदीपात्रात फेकला. सकाळी दहा वाजता एका स्थानिक पत्रकाराने मृतदेह पाहिला व खानापूर पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तिची ओळख पटविण्यासाठी तिच्या जीन्स पॅन्टची तपासणी केली असता त्यात एक सीम कार्ड आढळले. या सीम कार्डनेच आधी पूनमची ओळख पटली, नंतर तिच्या मारेकऱ्यांची.पूनमच्या पॅन्टमध्ये सापडलेले सीम कार्ड रिॲक्टीव्ह केल्यावर पोलिसांनी सीममधील क्रमांकावर कॉल केले. तीस जणांना कॉल केल्यावर एकानेही पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून पूनमची ओळख पटविण्यास सहकार्य केले नाही.. 

शेवटच्या एका नंबरवर पोलिसांनी फोन केल्यावर तो फोन हडपसरमधील एका हॉस्पिटलमधील रिसेप्शनीस्ट तरुणीचा निघाला. तीनेही पूनमला ओळखण्यास सुरवातीला नकार दिला. परंतु, खानापूरचे सर्कल पोलीस निरीक्षक मोतीलाल पवार यांनी तिच्या व्हॉटस्ॲपवर पूनमच्या मृतदेहाचा फोटो टाकल्यावर तिने पूनमला ओळखले. पूनम डॉ. सुनीलला भेटायला याच हॉस्पिटलला येत असल्याचे सांगितले. 

त्यानंतर पोलिसांनी पूनमच्या घरच्यांचा संपर्क क्रमांक मिळविला. पूनम व सुनील मधील गाढ मैत्री समजल्यावर कर्नाटक पोलिसांनी थेट पुणे गाठले. परंतु, सुनील हॉस्पिटलमध्ये नव्हता. त्याचा मोबाइल नंबर मिळाल्यावर मोबाइल लोकेशनच्या आधारे तो औरंगाबादमध्ये असल्याचे समजले. त्यानुसार कर्नाटक पोलीस थेट औरंगाबादमध्ये पोहोचले. पूनमला संपविल्यावर डॉ. सुनील औरंगाबादमध्ये एमबीए करणाऱ्या लहान भाऊ संजयच्या रुमवरच थांबला होता.

पोलिसांनी रविवारी (दि. १८) पहाटे दोघांना पकडले. सुरवातीला दोघांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलीसी खाक्या दाखविताच लग्नाच्या तगाद्यामुळे त्रस्त झाल्याने पूनमला संपविल्याची कबूली दिली.याप्रकरणी खानापूर पोलिसांनी दोघांविरूद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. 

बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख सुधीर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्र गराड, उपअधीक्षक करुणाकर शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्कल पोलीस निरीक्षक मोतीलाल पवार, सहाय्यक फौजदार के.एस. धरूर, उपनिरीक्षक संगेश हौसमनी, मुख्य हवालदार शिवकुमार, जगदीश, लतीफ, हलकी, मेहबूब यांनी आरोपींना गजाआड केले. पूनमने अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून नर्सिंग पूर्ण केले होते. लवकरच ती नोकरीला लागणार होती. परंतु, ज्याच्या बरोबर सातजन्म जगण्याच्या आणाभाका घेतल्या त्यानेच घात केला. 

'ते' ७२ तास... अन् आरोपी गजाआड..!.
मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारची आख्खी रात्र जागून काढली. पहाटे सीम कार्डच्या माध्यमातून पूनमची ओळख पटल्यावर मारेकऱ्यांच्या शोधासाठी कर्नाटक पोलीस महाराष्ट्रात दाखल झाले. पुणे, औरंगाबाद, राहुरी, सात्रळ असा अडीच हजार किलोमीटरचा प्रवास अवघ्या ७२ तासांत करत पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांना गजाआड केले. .

चहापान नको... दुवाँ द्या..! 
मयत पूनमच्या घरच्यांचा जबाब घेण्यासाठी सोमवारी सकाळी सर्कल पोलीस निरीक्षक मोतीलाल पवार व त्यांचे सहकारी धानोऱ्याला पूनमच्या घरी पोहोचले. तेथे जबाब घेतल्यावर पूनमच्या आठवणीत अश्रू ढाळणाऱ्या तिच्या कुटुंबियांना पूनमच्या मारेकऱ्यांना अटक केल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा काही नातलगांनी जाताना चहापानासाठी थांबण्याचा आग्रह केला. तेव्हा त्याला नकार देत पो.नि. पवार म्हणाले, पूनमच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाल्यावर आम्हाला फक्त दुवाँ द्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.