अवैध वाहतूक करणाऱ्यांना जिल्हाधिकारी महाजन यांचा तडाखा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्यात अवैधरीत्या वाळू वाहतूक करण्याचे प्रकार नेहमीच समोर येतात. प्रशासनाचा डोळा चुकवून गौणखनिजाचे उत्खनन व वाहतूक करण्याचे निर्ढावलेले प्रकार आढळून येतात. मात्र, कायदा धाब्यावर बसवून असे गैरप्रकार करणाऱ्यांची आता खैर नाही. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सक्‍त आणि शिस्तीचे जिल्हाधिकारी म्हणून ओळख झालेले अभय महाजन यांच्या कारवाईचा तडाखा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना बसला. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी टाकळी ढोकेश्‍वर चौफुल्यावर गाडीतून खाली उतरून ही कारवाई केल्याने अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले नसेल तरच नवल.

याबाबतची माहिती अशी, जिल्हाधिकारी अभय महाजन कार्यालयीन कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. आळेफाटामार्गे काल दुपारच्या सुमारास नगरकडे येत असताना टाकळी ढोकेश्‍वर येथील चौकातील अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारी काही वाहने महाजन यांच्या दृष्टीस पडली. त्यावेळी आपल्या गाडीचे वाहनचालक व अंगरक्षक यांना या वाहनांच्या पुढे गाडी घेण्याचे व ही वाहने अडविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या.

दरम्यान, ते स्वत:ही गाडीच्या खाली उतरले आणि त्या वाहनांच्या चालकाकडे वाळू वाहतुकीची चौकशी केली. दरम्यान, ती वाहने अडवून ठेवताना श्रीगोंदा, पारनेर उपविभागीय अधिकारी गोविंद दाणेज यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दरम्यान, टाकळी येथील पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: जातीनिशी वनकुटे, तास या पारनेर तालुक्‍यातील मुळा नदीच्या काठाच्या पट्ट्यात सुमारे दोन तास झाडाझडती घेतली. 

दरम्यान, स्वत: जिल्हाधिकारी कारवाईसाठी बेडरपणे उतरल्याची बातमी परिसरात हातोहात पसरली आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांनी खबऱ्यांच्या निरोपामुळे पोबारा केला. उपविभागीय अधिकारी तसेच अव्वल कारकून शरद झावरे, वासुंदेचे कामगार तलाठी निंबाळकर व वनकुटेचे तलाठी सोबले हेही तेथे पोहोचले. 

त्यानंतर सदरची अवैध वाळू वाहतूक करणारे एम. एच.45-1649, एचएच-14-2845 ही दोन्ही वाहने जप्त करून नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आली. दरम्यान, या दोन अवैध वाहतूक गाड्या जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी गोविंद दाणेज यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.