केडगावच्या लढाईत कोण बाजी मारणार ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगावच्या प्रभाग ३२ ब ची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने इच्छुकांच्या राजकिय हालचालींनी वेग घेतला आहे. ६ एप्रिलला निवडणूक होणार असल्याने केडगावचे राजकिय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कॉंग्रेसकडून विशाल कोतकर तर शिवसेनेकडून विजय पठारे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक असून, त्यांच्याकडून तशा प्रकारची राजकिय रणनिती आखली जात आहे. केडगावच्या लढाईत कोण बाजी मारणार? याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
माजी महापौर संदीप कोतकर यांना अशोक लांडे प्रकरणात शिक्षा झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने प्रभाग ३२ ब ची जागा रिक्त झाली होती. रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने पुन्हा केडगावमध्ये राजकिय युद्ध रंगणार आहे.

महानगरपालिकेची निवडणूक ७ ते ८ महिन्यांवर येवून ठेपली असली तरी केडगावची पोटनिवडणूक चुरशीची अन् अटीतटीचीच ठरणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचे पुतणे विशाल कोतकर हे प्रभाग ३२ ब मधून लढत देणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. शिवसेनेकडून विजय पठारे यांचे नाव निश्चित झाले असल्याचे बोलले जाते.

मागील निवडणुकीत संदीप कोतकर विरुद्ध विजय पठारे अशी लढत झाली होती. पठारे यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी चांगल्यापैकी मते मिळविली होती. श्री.कोतकर यांचा मोठ्या फरकाने विजय झाला होता. प्रभाग ३२ ब ची जागा कायम राखण्यासाठी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत. कोतकर पिता-पुत्रांच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेचीच ठरणार आहे.

मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा भरुन काढण्यासाठी शिवसेनाही सज्ज झाली आहे. शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार अनिलभैय्या राठोड, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी प्रभाग ३२ ब च्या पोटनिवडणुकीत लक्ष घातल्याने कोतकर व पठारे यांच्यात काट्याची टक्कर होणार असल्याचा सध्याचा रागरंग आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने अद्यापही प्रभाग ३२ ब च्या पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली नाही. राष्ट्रवादीचा कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा राहील, असे राजकिय संकेत मिळत आहेत. भारतीय जनता पक्षाची भूमिकाही गुलदस्त्यातच आहे. भाजप उमेदवार देणार की नाही? याबाबत सध्या तरी संभ्रमावस्था आहे. तथापि, ऐनवेळी काहीही राजकीय घडामोडी घडू शकतात. 

सध्यातरी कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना असाच राजकिय सामना रंगणार असल्याचे दिसून येते. इच्छुक उमेदवारांना १३ ते २० मार्च दरम्यान अर्ज दाखल करता येतील. २१ मार्चला प्राप्त अर्जाची छानणी होईल. २३ मार्चपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. २४ ला चिन्हवाटप होवून ६ एप्रिलला मतदान तर ७ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. केडगावच्या पोटनिवडणुकीकडे केडगावकरांचेच नव्हे तर संपूर्ण नगरकरांचे लक्ष लागले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.