व्यंकटेश पतसंस्थेत 1कोटी 93 लाखाचा आर्थिक अपहार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोनई येथील श्री व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेमध्ये मॅनेजर, कॅशिअर व लिपिकाने सामुदायिकरित्या कट रचून १ कोटी ९३ लाख ७ हजार ४०६ रुपयांचा अपहार केला असून याबाबत सनदी लेखापालांच्या फिर्यादीनुसार सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सनदी लेखापाल सुविद्या सुविजय सोमाणी यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले, की व्यंकटेश पतसंस्थेचे मॅनेजर शामकुमार शंकर खामकर यांनी संस्थेत बेकायदेशीर व्यवहार करून ६५ लाख ४ हजार ४७० रुपये वैयक्तिक फायद्यासाठी वापरले असल्याचे दिसून येते. ही रक्कम दि. ३१ मार्च २०१७ अखेरच्या व्याजासह वसुलीस पात्र आहे.

संस्थेचे लिपिक गणेश हरिभाऊ गोरे यांनी बेकायदेशीर व्यवहार करून त्यांच्या व नातेवाईकांच्या नावाने २७ लाख १३ हजार ३०२ रुपये व कॅशिअर गणेश अंबादास तांदळे यांनी २० लाख ५६ हजार ९२१ रुपये वैयक्तिक फायद्यासाठी वापरले असल्याचे दिसून येते. हीही रक्कम वसुलीसाठी पात्र असल्याचे म्हटले आहे.

अशा प्रकारे मॅनेजर खामकर, लिपीक गोरे व कॅशिअर तांदळे यांनी संगनमताने वसुली खर्च, १०१ कारवाई, र कारवाई, कलम ९१, कलम १३८ पोटी ४४ लाख ७३ हजार ४९ रुपये वेळोवेळी नावे टाकून स्वत:च्या वैयक्तिक वापरासाठी बेकायदेशीरपणे व्हाऊचरवर बोगस सही, शिक्क्यांचा वापर करून काढल्याचे निदर्शनास आले आहे. तसे पत्र वसुली अधिकारी यांनी दिले आहे. ते अहवालासोबत जोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दि.२३ नोव्हेंबर २०१७ रोजी तपासणीसाठी लॉकर उघडण्यात आले. सोनेतारण कर्ज खाते तपासले असता संस्थेच्या लॉकरमध्ये दोन बॅगा कमी आढळल्या. याबाबत पंचनामा संस्थेच्या कार्यालयात करण्यात आला. त्यानुसार सोने तारण कर्जापोटी ८६ हजार १५० इतका अपहार झाला आहे. मुदत ठेव, कर्जवाटप अधिकार मॅनेजर खामकर यांच्याकडे होते. तपासणी करताना २७ मुदत ठेव पावत्यांवर कर्ज बाकी ठेवून त्या परत केल्या. ही कर्ज रक्कम ३४ लाख ७३ हजार ५१४ इतकी आहे.

सर्व बाबींचा विचार करता १ कोटी ९३ लाख ७ हजार ४०६ रुपयांचा अपहार झालेला आहे. या गैरव्यवहार व अफरातफरीमुळे मॅनेजर, लिपीक व कॅशिअर यांनी अधिकारांचा गैरवापर करून संस्थेचे व ठेवीदारांचे हित न पाहाता मर्जीनुसार मनमानी पद्धतीने व संगनमताने स्वत:चे आर्थिक हित साधण्यासाठी संस्थेच्या रकमेची बेकायदेशीरपणे उचल केली असून बोगस सोने तारण कर्ज, बोगस मुदत ठेव तारण कर्ज दाखवून ठेवी धोक्यात आणणे, ठेवीदारांचा विश्वासघात होईल असे वागणे, संगनमताने चालाखपणे रकमेचा अपहार करून नियमांचे उल्लंघन करणे अशा गंभीर बाबी घडल्या आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.